रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी, महापूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे बाधित झालेले १ हजार ७०३ नागरिक अजूनही शासकीय निवारा केंद्रांमध्ये आहेत.
बाधित व्यक्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी खेड येथे १९, चिपळूणमध्ये १४, रत्नागिरीत १, संगमेश्वर तालुक्यात १६ तर दापोलीत ५ ठिकाणी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आज ५५ ठिकाणी १ हजार ७०३ नागरिक निवारा केंद्रात राहिले आहेत. त्यांची स्वतःची व्यवस्था अजून होऊ शकली नसल्याने त्यांना तेथे निवारा देण्यात आला आहे. सर्व बाधित नागरिकांना मदत पुरविण्यात आली आहे. तथापि कोणतेही नागरिक मदतीपासून वंचित असल्यास त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल .एकूण २९ गावांतील २१७ कुटुंबांना १०८५ लिटर केरोसिन पुरविण्यात आले आहे. बाधित झालेल्या एकूण २० हजार ३४१ लोकांना शिवभोजन थाळीचे वाटप ३० जुलै २०२१ अखेरपर्यंत करण्यात आले आहे. जुलैअखेर जिल्ह्यात सरासरी २६३२.८० मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १२८२ मिमी जास्त पाऊस झाला. गेल्या वर्षी या काळात १३५० मिलिमीटर पाऊस झाला होता. अतिवृष्टी झालेल्या प्राथमिक अंदाजानुसार १७८७ हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागाचे ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खेड, चिपळूण तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने बाधित मालमत्तांचे पंचनामे अद्यापही राहिले असतील. त्यांनी चिपळूण आणि खेडचे उपविभागीय अधिकारी, चिपळूण आणि खेडचे तहसीलदार, चिपळूण आणि खेड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती कळवावी. त्यांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पुरामध्ये ज्या नागरिकांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक गहाळ झाले असेल, अशा नागरिकांनी आपले खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधून बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड, आधारकार्ड क्रमांक उपलब्ध करून द्यावा तसेच त्यांच्या छायाप्रती उपलब्ध झाल्यास त्या मिळवून संबंधित तहसीलदारांकडे जमा कराव्यात. त्यामुळे त्यांना तत्काळ मदत करणे सोयीचे होईल. तसेच ई-आधारकार्ड मिळविणे सुलभ होईल. राज्यातील एकूण ६६ सामाजिक संस्था आणि २१ व्यक्तींनी पूरग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत मदत केली आहे.