साडेपाच लाख ग्राहकांना दिलासा; मान्सूनपूर्व कामाचा फायदा
रत्नागिरी:- जिल्ह्यात बहुतांश भागात ४ दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. या परिस्थितीतीमध्ये साडेपाच लाख ग्राहकांना अखंडित विद्युतपुरवठा देण्यासाठी महावितरणचे १ हजार ६८६ प्रकाशदूत कर्तव्यावर आहेत. मान्सूनपूर्व केलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे आणि नियोजनामुळे वीजवितरणात अजूनतरी कोणताही व्यत्यय आलेला नाही. भरपावसातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरणला यश आले आहे.
वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे वीजवितरण यंत्रणा कोलमडून पडण्याचा पूर्वैतिहास आहे. महावितरणने यावर्षी विशेष नियोजनातून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात राबवली. यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि राज्यातील पाच हजाराहून अधिक एजन्सीजचे कर्मचारी राबल्यानेच आतापर्यंतचा पाऊस राज्यातील नागरिकांसाठी सुसह्य ठरला आहे. मे आणि जून महिन्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी व संबंधित परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची वीजबंदची पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर केली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे धोके टाळण्यासाठी महावितरणकडून प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजखांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर, पिलरची जमिनीपासून उंची वाढवणे आदी कामे करण्यात आली. याचसोबत, रोहित्र आणि वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचरा, वाढलेले गवत व झुडपांचीदेखील विल्हेवाट लावण्यात आली. खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्या तोडण्यात आल्या. जिल्ह्यात त्यासाठी जनमित्र व बाह्यस्त्रोत कर्मचारी १ हजार ३८६ तर ३०० हून अधिक ठेकेदारांकडील कर्मचारी असे एकूण १ हजार ६८६ प्रकाशदूत सध्या कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे मुसळधार पावसातही अखंडित विद्युत पुरठा सुरू आहे.