१८ गरोदर महिलाना डेरवण, कोल्हापूरचा आधार

गेल्या १० दिवसातील चित्र; जिल्हा रुग्णालय अपुरे
 

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ रजेवर असल्याने रात्रीच होणाऱ्या प्रसुतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालयात दिवसभरात सुमारे ३५ ते ४० प्रसुती बाहेरील डॉक्टरांकडून करण्यात आल्या. गंभीर असलेल्या १८ प्रसूती केसेस डेरवण (चिपळूण) किंवा सीपीआरला (कोल्हापूर) पाठविण्यात आल्या. स्त्रीरोगतज्ञ डॉ. सांगवी दोन दिवसात हजर होणार आहेत. त्यामुळे आणखी दोन दिवस ही परिस्थिती राहणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिला सुरक्षित प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. महिन्याला साधारण २५० हून अधिक महिलांची प्रसुती रुग्णालयात होते. प्रसूती विभागातील डॉ. सांगवी हे वैयक्तीक कारणासाठी पंधरा दिवस रजेवर आहेत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यात हे अधिकारी रजेवर गेल्याने प्रसुती विभागात डॉक्टरांची वानवा होती. प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांची सुरक्षा अडचणीत आली होती. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी खासगी रुग्णालयातील चार डॉक्टरांना प्रसुती विभागाची जबाबदारी दिली होती. त्यापैकी डॉ. कांचन आणि डॉ. सातव यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत होते. दिवसाला तीन ते चार प्रसुती होत होत्या. मात्र रात्रीच्यावेळी खासगी डॉक्टर मिळणे कठीण होते. त्यामुळे नाईलाजास्तव एखादी गंभीर केस असेल तर डेरवण किंवा सीपीआरला पाठविली जाते. गेल्या दहा दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालयात ३५ ते ४० सुरक्षित प्रसूती झाल्या आहेत. तर प्रसूतीच्या १८ गंभीर केसेस डेरवण आणि कोल्हापूरला हलविण्यात आल्या आहेत. परंतु ही परिस्थिती आता जास्त काळ राहणार नाही. प्रसूती विभागातील डॉ. सांगवी दोन दिवसात हजर होणार आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर मातांना आता अन्यत्र हलविण्याची गरज भासणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.