ह.भ.प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठानच्यावतीने गरजू विद्यार्थी दत्तक, तसेच गरजूना धान्यवाटप

माजी सभापती शरद बोरकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्याने उपक्रम

खंडाळा:- आयुर्वेदाचे जाणकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती स्वर्गीय शरद बोरकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून स्व. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान, वरवडे यांच्या वतीने परिसरातील गरजू, होतकरू आणि बुद्धिवान विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना दत्तक घेण्यात आले. तसेच गरजुना धान्यवाटप करण्यात आले.

स्वर्गीय शरद दादा बोरकर यांनी आयुष्यभर शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्राची सेवा करताना आपल्या अभ्यासपूर्ण स्वभावाने अनेक वर्षे सातत्याने कार्य केले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागात त्यांच्या कार्याचे विशेष महत्व आहे. म्हणूनच काही वर्षांपूर्वी त्यांच्या निधनानंतर स्थापन करण्यात आलेल्या स्व. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान वरवडे यांच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक गुणवत्ता उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. त्यानुसार यावर्षीच्या दिनाच्या निमित्ताने वाटद आणि वाटद परिसरातील गरजू, होतकरू आणि गुणवान विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा संकल्प करून, स्व. शरद दादा बोरकर यांच्या जयंतीनिमित्त पाच विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना आर्थिक मदत प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. सदर विदयार्थ्यांच्या पुढील वाटचालीत त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्व. शरद दादा बोरकर प्रतिष्ठानने घेतली असल्याची माहिती यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त समीर बोरकर, निखिल बोरकर यांनी दिली.

यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांपैकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अरुण मोर्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत स्व. शरद दादा बोरकर यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देताना विद्यार्थी दत्तक योजनेचे स्वरूप सांगितले.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती वाटद कवठेवाडीच्या अध्यक्षा स्वाती धनावडे, विश्वनाथ शिर्के, प्रतीक माने, सतीश हळदणकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी उपक्रमाचे प्रास्ताविक माधव अंकलगे यांनी तर आभार प्रदर्शन राधा नारायणकर यांनी केले.