होळी, शिमगा या सणाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग अलर्ट

रत्नागिरी:- होळी, शिमगा या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारुची निर्मिती, वाहतुक तसेच विक्री होण्याच्या शक्यतेने रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. अवैध मद्यावर करडी नजर असून त्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येत आहे. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी, अवैध दारु व्यवसायांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. अवैद्य मद्याविरोधात वर्षभरात या विभागाने 1 हजार 190 गुन्हे दाखल केले. त्यात 964 आरोपींना अटक करून ०६ वाहनांसह १ कोटी ६३ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अवैध मद्याविरुध्द जोरदार मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये अवैद्य व्यवसायाविरुद्ध एकूण १ हजार १८० गुन्हे दाखल केले. त्यामध्ये ९६४ संशयित आरोपीतांना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये हातभट्टीची गावठी दारु २५ हजार ९३५ लिटर, देशी मद्य ४८४.५६ ब. लिटर, महाराष्ट्रात विक्री करीता असलेले विदेशी मद्य ३३६.५६ ब. लिटर, बियर ८३.८५ ब. लिटर, गोवा राज्यात निर्मित ३१५०.१५ व. लिटर, रसायन २६०७५० लिटर, प्लॅस्टिकचे बॅरल व कॅन, काचेचे ग्लास तसेच अवैध मद्याची अवैध वाहतुक करणारी एकूण ०६ वाहने, असा एकूण १ कोटी ६३ लाख ३४ हजार ३३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

होळी, शिमगा सणाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरुन प्रवाशी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून सुरू आहे. गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतुक होऊ नये, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या आदेशानुसार अवैध मद्याविरुध्दची अशीच कारवाई या पुढेही सुरुच राहणार आहे.

एप्रिल २०२४ पासून अद्यापपर्यंत महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ नुसार चांगल्या वर्तणुकीचे 61 प्रस्ताव जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर केले आहेत. त्यापैकी ३३ प्रकरणात रुपये २१ लाख ५० हजार एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणूकीची बंधपत्रे सतत अवैध दारुधंदयात गुंतलेल्या आरोपीत इसमांकडून घेण्यात आली आहेत.