होम आयसोलेशन दोन दिवसात बंद; 200 गावांत होणार कोविड केअर सेंटर

रत्नागिरी:- गृहविलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार गृह विलगीकरणातील लोकांना कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाईल. त्यासाठी जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या 200 गावांमध्ये नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे यावर नियंत्रण राहणार असून त्यासाठी येणारा खर्च हा 15व्या वित्त आयोगातील निधीमधून केला जाणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी सांगितले.जिल्हा परिषदेतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सीईओ इंदूराणी जाखड, उदय बने, परशुराम कदम, बाबू म्हाप उपस्थित होते.

सामंत म्हणाले, गृह विलगीकरण बंदचे आदेश आल्यामुळे घरीच उपचार घेत असलेल्यांना लवकरच कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाणार आहे. जागा अपुरी पडू नये यासाठी नवीन कोविड केअर सेंटर ग्रामपंचायत स्तरावर सुरू केली जातील. त्यासाठी जिल्हा परिषद नियोजन करत आहे. दोन हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावातील बाधितांची संख्या पाहून दहा बेडचे सेंटर सुरू केले जाईल. एकाच गावात पंधरा बाधित सापडले तर त्यांची घरीच व्यवस्था करणे शक्य होत नाही. त्यांची व्यवस्था सीसीसीत केल्यास त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाते आणि प्रादुर्भाव थांबवता येईल.

होम आयसोलेशन दोन दिवसात बंद होणार आहे. कमी लोकसंख्येच्या गावातही तीन ते चार बेडची छोटी सेंटर उभारण्यासाठी आवाहन केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे तीन हजार बेडची व्यवस्था होईल. होम आयसोलेशन बंद केले तरीही बाधितांना कोठे ठेवणार हा प्रश्‍न सुटेल, असा विश्‍वास मंत्री सामंतांनी व्यक्त केला.

मंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक

कमी केंद्र, अपुर्‍या लशीच्या साठ्यामुळे लसीकरणात सुरवातील गोंधळ होता; परंतु जिल्हा परिषदेने योग्य नियोजन केल्यामुळे लसीकरण सुरळीत होत आहे. नुकतेच तेरा हजार डोस प्राप्त झाले असून एका दिवसात ते दिले जातात. जिल्ह्यातील 16 टक्के जणांना लस देऊन झाली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगत कौतुक केले.