होणाऱ्या सुनेच्या खून प्रकरणी सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

रत्नागिरी:- होणार्‍या सुनेवर वाईट नजर ठेवून तिचा खून केल्याप्रकरणी फणसवणे (गुरववाडी) येथील सुनिल रामचंद्र गुरव (वय ४७) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १ डिसेंबर २०१८ रोजी घडली होती.

संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा येथे राहणारी विशाखा अजय महाडिक (वय १९) ही तरूणी लोवले येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या तरूणीचे महेंद्र सुनील गुरव या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. १ डिसेंबर २०१८ रोजी ती बेपत्ता झाली आणि तब्बल २६ दिवसांनी तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला होता.

विशाखा हिचे महेंद्रसोबत प्रेमसंबंध होते. तिचे त्याच्या घरी येणे-जाणे होते. संगमेश्‍वरसह मुंबईतील घरीदेखील ती जावून आली होती. विशाखाच्या उजव्या हातावर एक पांढरा डाग होता आणि तो डाग घालविण्यासाठी मी प्रयत्न करणार असे महेंद्रचे वडिल सुनिल गुरव वारंवार सांगायचे. सुनिल यांची तिच्यावर वाईट नजर होती.

विशाखा ही १ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र ती रात्री उशीरापर्यंत घरी आली नाही. दुसर्‍या दिवशी तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार संगमेश्‍वर पोलिसांना दिली होती. त्यानुसार बेपत्ताची नोंद दाखल करण्यात आली.

विशाखा ही कॉलेजला न जाता तिला सासर्‍याने मोगरवणे येथे जाण्यासाठी बोलावून घेतले होते. संगमेश्‍वर येथून देवरूखला ती दोघे एस्. टी. ने गेले व त्या ठिकाणी शिवाजी चौक परिसरातील रिक्षाने मोगरवणे येथे दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गेले.

होणार्‍या सासर्‍याच्या मनात काय आहे हे विशाखाला माहित नव्हते. मोगरवणे खांबटमार्ग पायवाटेने होणारे सासरे सुनिल यांनी तिला जंगलात नेले. सुनिल यांची तिच्यावर सुरूवातीपासूनच वाईट नजर होती. मात्र सतत त्यांचे फोनवर बोलणे होत असल्याने तिच्या मनात जराही संशय आला नाही.

विशाखा हिला खांबटमाळ येथील जंगलात घेऊन गेल्यानंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास डोक्यात वाईट हेतू ठेवून ओढणीने गळा आवळून तिचा खून केला व तिचे प्रेत तेथेच टाकून तिच्या हातातील घड्याळ, मोबाईल व इतर चीजवस्तू काढून घेतल्या व तेथून सुनिल हे निघून गेले.

विशाखा हिच्या हातातील घड्याळ व मोबाईल हॅण्डसेट सुनिलने मुंबई येथील आपल्या घरी लपवून ठेवला व तिची सॅक, सँडल अशा वस्तू चिपळूण ते संगमेश्‍वर रोडलगत टाकून पुरावा नष्ट केला होता. तिचा खून करण्यापूर्वी नेमके काय घडले हे तपासात कुठेही आले नाही.

विशाखा बेपत्ता झाल्याची तक्रार संगमेश्‍वर पोलीस स्थानकात दाखल झाली होती. संगमेश्‍वर पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र त्याला यश आले नाही. २६ दिवसांनी जंगलमय भागात गुरख्यांना एका तरूणीचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत दिसून आले. याची माहिती तात्काळ देवरूख पोलिसांना देण्यात आली. यावेळी हा मृतदेह विशाखा हिचा असल्याची ओळख पटली होती.

२६ दिवसांनी विशाखाचा मृतदेह मिळून आला. अंगावरील कपडे आणि डीएनए चाचणी यामुळे विशाखाची ओळख पटली. या खून प्रकरणी देवरूख पोलीस स्थानकात भादंविक ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुढील तपास देवरूख पोलिसांकडे आला आणि पोलिसांनी या खुनाची पाळेमुळे खणून काढली.

विशाखा बेपत्ता झाल्यानंतर तिचा सर्वत्र शोध सुरू होता. होणारा सासरा सुनिल गुरव हादेखील तिच्या घरच्यांसोबत शोध घेण्यासाठी पुढे होता. इकडे जाऊया, तिकडे जाऊया असे सांगून तो सतत सार्‍यांची दिशाभूल करीत होता.

ज्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर ज्या रिक्षातून त्यांनी देवरूख ते मोगरवणे असा प्रवास केला ते रिक्षा चालक पवन भोई यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. १ डिसेंबर रोजी आपल्या रिक्षातून विशाखा व सुनिल गुरव यांनी मोगरवणेपर्यंत प्रवास केल्याचे भोई यांनी पोलिसांना सांगितले तर दुसरे रिक्षा चालक अनिल पाटेकर यांच्या रिक्षातून २ डिसेंबर रोजी म्हणजेच खुनाच्या दुसर्‍या दिवशी अनिल पाटेकर यांच्या रिक्षातून देवरूख ते मोगरवणे ते पुन्हा देवरूख येथे सोडल्याचे पाटेकर यांनी पोलिसांना सांगितले होते.

परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय पुरावा शाबित करण्यासाठी सरकारी पक्षाने २८ साक्षीदार तपासले. जवळपास ६ वर्षे हा खटला न्यायालयात चालला. या खटल्यात ३० पेक्षा अधिक केस लॉ चे दाखले देण्यात आले. या प्रकरणात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आरोपी सुनिल रामचंद्र गुरव (वय ४७) याला भादंविकम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच १० हजार रूपयांचा दंड सुनावला. भादंविक २०१ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. या दंडापैकी ८ हजार रूपये रक्कम विशाखा हिच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या खटल्यात सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी आपले कसब पणाला लावले. जोरदार युक्तीवाद त्यांनी न्यायालयात केला होता तर मृतदेहाची माहिती प्रसाद अपडकर यांनी पोलिसांना दिली ते अपडकर व सरकारी वकील प्रफुल्ल साळवी हे दोघेही देवळे गावातील रहिवासी आहेत. या खटल्यात रिक्षा व्यावसायिक पवन भोई, अनिल पाटेकर, प्रसाद अपडकर यांनी निर्भिडपणे कोर्टात साक्ष नोंदवली. पैरवी अधिकारी म्हणून पो. हे. कॉ. वर्षा चव्हाण-लांजेकर यांनी काम पाहिले.