रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय येथील हॉटेलमध्ये बुधवारी रात्री किरकोळ कारणातून सात जणांना हातांने तसेच दगडाने मारहाण केली होती. याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित तिघांनाही आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफियान गुहागरकर (२२, रा. आझादनगर, रत्नागिरी), भुषण सावंत (२३, रा . मिऱ्याबंदर , रत्नागिरी) आणि जैद मजगावकर (२५, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विमल रामकुमार जांगिड (३५, सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानूसार, बुधवारी रात्री १०.१५ वा. विमल जांगिड त्याचे मित्र अमितकुमार गुरीया, रतीष परमेश्वरन, पवनकुमार सिंह, विपीन सुरेशचंद्र, मिथिलेश रामसहाय राम, रविकुमार चौहान यांच्या सोबत चर्मालय येथील गुडलक हॉटलमध्ये जेवत होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागे बसलेल्या संशयित तिघांनी त्यांना मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. त्यावर तुम्ही सुध्दा सावकाश बोला असे संशयितांना सांगण्यात आले . याचा राग आल्याने संशयितांनी त्यांना शिवीगाळ मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी तिन्ही संशयितांना गुरुवारी दुपारी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.