रत्नागिरी:- घरगुती वादातून मित्रानेच मित्रावर सुरीने सपासप वार करुन जीवघेणा हल्ला केल्याची घटना खेडशी परिसरात घडली. तब्बल सात वार या तरुणावर करण्यात आले. आपला बचाव करताना तरुणाने आपल्याकडील चाकूने हल्ला करणार्या तरुणावर देखील चाकूने वार केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५वा.च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान बाबामियॉं मस्तान हा हिस्ट्रीसीटर असून तो गेल्या १ महिन्यापासून त्याचा मित्र विनायक हेडगे याच्याकडे रहायला होता. या दोघांचे घरगुती संबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये अज्ञात कारणावरुन बिनसले होते. त्याचे पर्यवसन मंगळवारी जीवघेणा हल्ल्यात झाले.
मंगळवारी रात्री विनायक घरी आल्यानंतर त्याने आपला मित्र रेहान याच्यावर चाकूने हल्ला केला. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सपासप सात वार रेहान याच्यावर केले. विनायक वार करत असतानाच बचाव करताना रेहान याने आपल्याकडील चाकूने विनायक याच्या हातावर वार केला. मात्र विनायक हा बेभान झाला होता. त्याने आपला हल्ला सुरुच ठेवला.
या हल्ल्यात रेहान गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. रेहानवर हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच आरडाओरड सुरू झाली. अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. रेहान याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रेहानवर गंभीर घाव घातल्याने त्याला पुढील उपचाराकरिता कोल्हापूर येथे हलविण्याची कार्यवाही सुरू होती.
दरम्यान विनायक याने हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरुन केला याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कौटुंबिक वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत जाब जवाब नोंदविण्याचे काम सुरू होते.