डॉ. संघमित्रा फुले; खच्चीकरण नको
रत्नागिरी:- मागील चार महिने पोलिस आणि आरोग्य विभाग कोरोनाशी लढा देत आहे. ना कौटुंबिक सुख, ना व्यक्तिगत स्वतंत्र. तरी देशसेवा म्हणून कोरोनाशी हिंमतीने लढा देत आहोत. मात्र एखाद्याचा मृत्यू झाला की लगेच आरोग्य विभागाला दोषी धरले जाते, हे योग्य नाही. या आजारावर नेमकी लस नसल्याने एखादा गंभीर रुग्ण चांगला होतो, तर चांगला रुग्ण गंभीर होतो. परंतु विनाकारण आम्हाला लक्ष्य करून प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण केले जाते. जिल्ह्यातील 1 हजार 81 रुग्णांपैकी 665 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी चांगली आहे. कोरोनामुळे रुग्ण बरे होतात, घाबरून जाण्याची गरज नाही, हा संदेश लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे, अशी तळमळ प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी बोलताना व्यक्त केली.
कोरोनामुळे रत्नागिरीतील एका तरुणाचा मृत्यू झाला आणि या विषयाला पुन्हा फाटे फुटले. आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला असा आरोप झाला. यावर डॉ. फुले यांनी ही खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, कोरोना महामारीवर अजून नेमकी लस आलेली नाही. तरी जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि चांगली सेवा असल्याने कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिस आणि आरोग्य विभाग गेली चार महिने या रोगाशी लढा देत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन हे कोरोनावर रामबाण उपाय नाही. अशक्तपणा, काहीवेळा रक्त गोठण्याचा प्रकारही होतो. तसेच कोरोनाच्या भितीमुळे तणाव येऊ शकतो. अशी अनेक कारणे आहेत. आम्ही जेवढे शक्य तेवढे चांगले उपचार देण्याचा प्रयत्न करीत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. 85 टक्के रुग्णांना काही होत नाही. 12 ते 13 टक्के रुग्णांना बाधा होते. 3 ते 4 टक्के मृत्यूचा दर होता तो आम्ही 1 टक्क्याने आणखी कमी केला. त्यामुळे वारंवार यंत्रणेला दोष देणे योग्य नाही.
शासनाने जी मार्गदर्शन तत्वे दिली आहेत. त्याची कडक अंमलबजवाणी प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. गर्दी करू नका, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करा, वारंवार हात धुवा, असे वारंवार आवाहन करूनही अनलॉक काळात लोक बाजरपेठेत गर्दी करतात. त्यामुळे याचा फैलाव अधिक होतो. परंतु दोष आरोग्य विभागाला दिला जातो. गेले चार महिने कर्मचारी आणि आम्ही राबत आहोत आणि पुढेही राबत राहू. परंतु आपल्या प्रत्येकाचीही ती जबाबदारी आहे. फैलाव रोखण्यासाठी 14 ते 28 दिवस क्वारंटाईन होणे आवश्यक आहे, असेही डॉ. फुले यांनी स्पष्ट केले.