हापूसच्या मोहोरावर, फळधारणेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

रत्नागिरी:- जिल्ह्यात अपेक्षित थंडी गायब झाल्याचे परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. त्यामुळे नव्याने फुटवा धरण्याऐवजी मोहोरावर व फळधारणेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना विविध उपाययोजना कराव्या लागत असून हंगामाची सुरुवातच अतिरिक्त खर्चाने करावी लागत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थकारण आंबा पिकावर अवलंबून आहे. वारंवार उद्भवणार्‍या वादळी वातावरणाने जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत आहे. त्याचा फटका बागायतदारांना बसत असून, बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी बिघडत चालली आहे. यावर्षी मोसमी पाऊस गेल्यानंतर नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू झाली. मात्र त्यामध्ये सातत्य न राहिल्याने आता मोहोराला फुटवा धरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मोहोरांचे रुपांतर फळात होण्यातही विलंब लागत आहे. अशातच तापमान वाढीने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर 10 ते 15 दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहोर खराब झाला. दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यात मोहोर मात्र टिकून आहे. दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यात सर्वत्र मोहोर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे, सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत.