रत्नागिरी:-आखाती देशांपाठोपाठ रत्नागिरी हापूसची इंग्लडमधील निर्यातीला दोन दिवसांपुर्वी आरंभ झाला. बारामती येथील पॅकहाऊसमधून साडेतीन हजार किलो आंबा प्रथमच पाठविण्यात आला आहे. या पहिल्या आंब्याला भारतीय चलनानुसार पाच डझनला १८०० ते १९०० रुपये दर मिळाला.
वातावरणातील बदलांमुळे यंदाचा हापूस हंगाम लांबणीवर गेला आहे. मार्च महिन्याच्या आरंभीला अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. तरीही यंदा पणन, कृषी विभागाकडून हापूसची निर्यात वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आंब्याच्या निर्यातीत घटली होती. त्यामुळे यंदा मार्चच्या दुसर्या आठवड्यात होळीच्या मुहूर्तावर हापूसची पहिली शिपमेंट इंग्लंडला रवाना झाली. पुण्यातील एका व्यावसायिकाकडून साडेतीन हजार किलो आंबा विमानातून पाठविण्यात आला. इंग्लंडमधील आयातदार तेजस भोसले हे दरवर्षी हापूसच्या विक्रीसाठी विशेष प्रयत्न करत असतात. यंदाही त्यांनी रत्नागिरीतील काही बागायतदारांशी थेट संवाद सुरु ठेवला आहे. त्याचबरोबर मुंबई, पुण्यातील व्यावसायिकांमार्फत ते आंबा इंग्लंडमध्ये विक्रीसाठी नेत असतात. १९ मार्चला हापूस तिकडे पोचला असून पहिल्या आंब्याला सर्वसाधारणपणे १८०० ते १९०० रुपये दर मिळाला आहे.