देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील हातीव फणस स्टॉप येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला. उपासमारीमुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. हा बिबट्या सुमारे एक ते दीड वर्षाचा होता. याबाबत ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
संगमेश्वर तालुक्यातील हातिव फणस स्टॉप येथे रस्त्याच्या बाजूला रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना बिबट्या निपचीत पडलेला दिसुन आला. त्यानंतर याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. पाहणी दरम्यान निपचित पडलेला बिबटा मृत असल्याची खात्री झाली. यावेळी साखरपा बिट वनरक्षक सहयोग कराडे, फणगुस बिट वनरक्षक आकाश कडुकर, आरवली बीट वनरक्षक सुरज तेली यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला
बिबट्या मृत असल्याची खात्री झाल्यानंतर पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याचे शवविच्छेदन केले. यावेळी बिबट्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नसल्याचे दिसून आले. भक्ष्य मिळवियासाठी वन्यप्राण्यांशी झटापट करताना बिबट्याच्या अंगावर व्रण पडले आहेत. हा बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्षाचा होता. रितसर कार्यवाही करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, देवरुखचे वनपाल तौफिक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने काम केले.