राजापूर:- तालुक्यातील जैतापूर-हातिवले सागरी महामार्गावरील हातिवले येथे उतारावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये जुवाठी येथील विजय विठोबा बाणे (50) जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सांयकाळी घडली.
या पकरणी मिळालेल्या माहितीनुसार जुवाठी येथील विजय बाणे हे गुरूवारी दुपारी जुवाठी येथून दुचाकीने राजापूर येथे येत असताना हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालया लगत असलेल्या उतारावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीमध्ये गेली. यामध्ये विजय बाणे यांच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी राजापूर ग्रामीण रूग्णालय येथे जाऊन पंचनामा केला. त्यानंतर सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.