हातिवलेत पोलीस बंदोबस्तात टोल वसुली पुन्हा सुरू

काम अपूर्ण असताना टोल वसुलीला स्थानिकांचा विरोध

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्यातील काम पूर्ण झाले नसताना टोलनाका सुरू करण्यास विरोध करीत यापुर्वी दोनवेळा टोलवसुली करण्याचे प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडलेले होते. या विरोधात स्थानिकांनी रस्त्यावर उतरत काम पुर्ण होत नाही व स्थानिकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर टोलवसुली स्थगित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा महामार्ग प्रशासन व टोलवसुली ठेकेदाराकडून मंगळवारपासून पुन्हा एकदा हातिवले येथील टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्तामध्ये टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. मात्र काम अपुर्ण असताना होत असलेल्या या टोलवसुलीला स्थानिकांनी विरोध दर्शविला असून या विरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे राजापुरात पुन्हा एकदा टोलविरोधाची धार तीव्र होणार आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर काम होणे बाकी आहे, कोठेही टोलवसुली सुरू झालेली नाही, मात्र असे असतानाही व राजापूर तालुक्यात काम अपुर्ण असतानाही प्रशासनाकडून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राजापुरकरांतुन आणि वाहन चालकांतुन नाराजीचा सुर उमटत असून राजापूरकरांना कोणी वाली नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोल आकारणी करण्यात येणार आहे. याकरीता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्याच्या हद्दीत हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. टोल वसुलीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले असून संबंधित कंपनीला टोलवसुलीचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी आम अपुरे असल्याने सर्वच पक्षांनी या टोलवसुलीला विरोध करीत टोल वसुली थांबविली होती. त्यानंतर दोन वेळा संबंधित कंपनीने टोल वसुली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजापूरवासीयांनी तो हाणून पाडला. त्यावेळी राजापूरवासियांनी टोलवसुली विरोधात उग्र आंदोलनही छेडले होते. त्यावेळी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरच टोल वसुलीबाबत बैठक आयोजित करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असून तोपर्यंत टोलवसुली स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केले होते. त्यानंतर, डिसेंबर महिन्यापासून टोलवसुली थांबविण्यात आलेली होती.

मात्र, मंगळवार पासून पुन्हा एकदा हातविले येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. टोलवसुलीला असलेला विरोध लक्षात टोलनाक्यावर राजापूर पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

दरम्यान, टोलवसुलीला सुरूवात करताना स्थानिकांच्या मागण्या संबंधितांनी मंजूर केलेल्या नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात आता पुन्हा एकदा संघटीत होऊन लढा देण्याची तयारी स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे राजापुरात पुन्हा एकदा टोल विरोधी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

90 टक्के काम पुर्ण झाल्याने टोल वसुली सुरू -महामार्ग प्राधिकरण

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील वाकेड या टप्प्यातील 90 टक्के काम पुर्ण झाले आहे. तर पुढे तळगाव ते कणवली हे कामही पुर्ण झालेले आहे. त्यामुळे हातिवले येथील या टोल नाक्यावर आता नियमाप्रमाणे टोलवसुली केली जाणार असून ती सुरू करण्यात आल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता होणारी टोलवसुली ही शासनाच्या नियमा प्रमाणे व निर्देशाप्रमाणे असल्याचे स्पष्टीकरणही या विभागाने दिले आहे.