हातखंबा- रत्नागिरी मार्ग लवकरच सिग्नेचर रोड

जिल्हाधिकारी डॉ. पाटील ; शहराच्या सौदर्यात भर

रत्नागिरी:- मुंबईच्या सहारा विमानतळाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आकर्षक झाडामधून जाण्याचा जो आनंद मिळतो, तो आनंद लवकरच रत्नागिरीकराना आणि पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे. हातखंबा ते रत्नागिरी हा रस्ता लवकरच सिग्नेचर रोड म्हणून त्या पद्धतीने विकसित केला जाणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.  

या रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक झाडे लावण्यात येणार आहेत. रत्नागिरीत प्रवेश करताना ही आकर्षक झाडे पर्यटकांचे स्वागत करणार आहेत. सीएसआरमधून निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे, रत्नागिरीत पर्यटन वाढीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्याचाच हा एक भाग आहे.

रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकांवर आकर्षक झाडे आणि त्यातून धावणारी वाहने असे चित्र रत्नागिरीकरांना लवकरच पहायला मिळणार आहे. रत्नागिरीत सिग्नेचर रोड दोन टप्प्यात साकारण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात साळवीस्टॉप ते मांडवीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहे. तसेच दुभाजकांवरही झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्यात हातखंबा ते साळवीस्टॉप दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. हातखंबा ते मांडवी दरम्यानचा रस्ता सिग्नेचर रोड म्हणून ओळखला जाणार आहे. आजूबाजूला आकर्षक वृक्षवल्ली आणि त्यामधून जाणारा रस्ता रत्नागिरीची नवी ओळख ठरणार आहे.

सीएसआरमधील निधीतून ही झाडे लावण्यात येणार आहेत. बाओबाब वृक्षाजवळ सेल्फी पॉइंट विकसित करणार काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी महिला रुग्णालयाच्या आवारातील बाओबाब हा वृक्ष शोधला होता. चारशे वर्षांपूर्वीचा हा वृक्ष जतन करून त्याठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. हा सेल्फी पॉइंट आणि तेथील सर्व सुशोभीकरण अल्ट्राटेक कंपनी करणार आहे. कंपनीने बनवलेल्या आराखड्यातील काही आराखडे लवकरच निश्चित करण्यात येतील.