बेकायदेशीर दारू वाहतुकीवर मोठी कारवाई, संशयिताला पोलिस कोठडी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. मुदत संपलेल्या आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या औषध साठ्यामध्ये लपवून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतुक केली जात होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत गोवा बनावटीची २४ लाख ९३ हजाराची विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी एकाला अटक केली असून वाहन जप्त करण्यात आले आहे. संशयिताला न्यायालयातने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोविंद जयराम वराडकर (वय ३२, रा. पावशी, तवटे महाडेश्वरवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील हातखंबा येथील शांती धाब्यासमोरील रस्त्यावर घडली. मिळालेली माहिती अशी, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात विदेशी दारुची बेकायदेशीर ने-आण होत असते. थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कचे पथक सतर्क झाले आहे. जिल्ह्यात अशा बेकायदेशीर वाहतूकीवर निर्बंध आणण्यासाठी हे पथक कार्यरत आहे. उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी निरीक्षक एस. ए. भगत व त्यांच्या पथकाने हातखंबा येथे सापळा रचला होता. वाहनांची तपासणी करत असताना संशयित गोविंद वराडकर हे सहाचाकी मोठे वाहन (एमएच-०७-एस-१८८२) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. संशयावरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या वाहनाला थांबवून त्याची तपासणी केली. वाहनामध्ये मुदत संपलेली आणि आरोग्याला हानिकारक अशा औषधांचा साठा होता. मात्र खबर पक्की असल्याने पथकाने त्याची झडती घेतली तर औषध साठ्याच्या खाली २५३ विदेशी दारुचे बॉक्स सापडले. पोलिसांनी तत्काळ वाहन ताब्यात घेतले. वाहनासह २४ लाख ९३ हजार २०० रुपयांचा दारुचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी तत्काळ संशयिताला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलाम ६५ (अ) (ई) ८१,८३,९०, अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. भगत करत आहेत.