हातखंबा येथे ट्रक-पल्सरचा अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:-रत्नागिरीतील हातखंबा येथील रिलायन्स पैट्रोल पंपानजिक आयशर ट्रक व पल्सर दुचाकी यांच्यात शुक्रवारी पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

एम एच.04 एच.डी.1268 हा आयशर ट्रक देवगड येथून आंब्याच्या पेट्या भरुन मुंबईकडे जात होता. दुचाकीस्वार तेजस विष्णू रामगडे (21) एम.एच.08 वाय. 4151 ही पल्सर गाडी रिलायन्स पेट्रोल पंपानजिक हयगयीने चालवत होता. तिथे दोन्ही गाड्यांमध्ये टक्कर झाली. यामध्ये दुचाकीस्वार तेजस विष्णू रामगडे याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

सदर घटनेचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी (आय.पी.एस.) करित आहेत. सदरची माहीती रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल उदय वाजे यांनी दिली.