हातखंबा येथे ट्रकची समोरासमोर धडक; चालक ठार

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर अपघात मालिका अजुनही थांबल्याचे दिसत नाही. बुधवारी सायंकाळी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की अपघातग्रस्त वाहनांपैकी एका चालकाचा जागीच दुर्दैवी अंत झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत.

अपघातासंबंधी अधिक वृत्त असे की, बुधवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास आयशर टेंपो (एमएच-09-8698) कोल्हापूर ते रत्नागिरी तर सोळाचाकी ट्रक (एमएच-09-एफएल-9153) रत्नागिरीतून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हातखंबा येथील अवघड वळणावरील पुलावर सदरचा अपघात झाला. या अपघातात हातखंबा परिसरातीलच चालकाचा मृत्यू झाला आहे. मृत चालकाचे नाव राजन बाबल्या डांगे असे असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक परिसरातील चालकाचाच बळी गेल्याने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त आहे.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरच्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, पोलिसांचे प्रयत्न सुरु होते.