हातखंबा येथे जोरदार अपघात; ट्रकने दुचाकीला उडवले

वडील, मुलाचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार राजेश महादेव धुमक (वय ३४), मुलगा साईश धुमक (वय ४) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ऋतुजा राजेश धुमक (वय ३०) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री हा अपघात झाला.

बुधवारी रात्री हातखंबा बसस्टाॅपजवळ एक खाजगी लक्झरी उभी होती. यावेळी रत्नागिरीच्या दिशेने चाललेला ट्रक (क्रमांक एमएच-४२-टी-१३०१) हा उतारातून भरधाव वेगाने येत असताना ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक एका झाडावर आदळून लक्झरीला ओव्हरटेक करून पुढील जात असताना रत्नागिरीहून पालीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देऊन दुचाकी सुमारे २०० मीटर फरफटत घेऊन गेला. यावेळी मोटारसायकलवरील राजेश धुमक, ऋतुजा धुमक, मुलगा साईश धुमक हे तिघेही रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. यावेळी राजेश धुमक यांचा जागीच मृत्यू झाला तर ऋतुजा व मुलगा साईश यांना जगद्गुरू नरेंद्र महाराज रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान साईशचाही मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या ऋतुजा धुमक यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी आपल्या सहकार्यांसह धाव घेतली. या अपघातप्रकरणी ट्रक चालक शेखर राजेंद्र कोंढे (रा.अहमदनगर) याच्याविरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.