हंगामात दोन टप्प्यात हापूस उत्पादन मिळण्याची शक्यता

रत्नागिरी:- दिवाळीच्या पूर्वसत्रात झालेल्या पावसामुळे आंब्याच्या येणार्‍या हंंगामात बागायतदरांना दोन टप्प्यांत उत्पादन घेण्याचा बोनस मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. दिवाळीच्या आधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पावसाने आंब्याचा हंगाम डिसेंबर ते मार्च (2024) आणि मार्च ते मे (2024) अशा दोन्ही टप्प्यांत उत्पादन मिळण्याची शक्यता वाढली आहे.

गेले दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला होता. हा पाऊस बागायतदरांच्या पथ्यावर पडण्याचा अंदाज बागायतदार व्यक्त करीत आहेत.
साधारणपणे आंब्याची बेगमी दिवाळी झाल्यानंतर गुलाबी थंडीच्या चाहुलीने सुरू होते. प्राथमिक बेगमी हाती घेण्याच्या तयारीत असताना दिवाळी आधीच रत्नागिरीसह सिंधुदुुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हलका गारठा पडत असताना पडलेल्या पावसाने कलमांना नवीन फुटवे धरण्याची प्रक्रिया बागांमध्ये सुरू झाली होती. त्यामुळे मोहोर प्रक्रियाही वेगाने होईल. यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन लवकर येण्याची शक्यता नाचणे येथील बागायतदार अनिरुध्द साळवी यांनी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्च (2024) अखेर मिळण्याची शक्यता या पावसाने वाढविली आहे. त्या नंतर वातावरण अनुकूल राहिल्यास मार्च ते एलिलमध्ये सुरु होणारा दुसर्‍या टप्प्यातील फळधारणा मे अखेरीस मिळाल्यास दोन्ही टप्प्यांतील उत्पादन घेण्यासाठी सध्या तरी वातावरण अनुकूल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दि. 7 नोव्हेंबरला रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला. त्या नंतर हलक्या पावसाचे सातत्य असताना काही भागात शुक्रवारीही पाऊस झाला. मात्र, त्यामध्ये जोर नव्हता ही बाब सध्या तरी बागायतदरांच्या पथ्यावर पडण्याचा अंदाज बागायतरांनी व्यक्त केला.
दक्षिण कोकणात पडलेला पाऊस मात्र जोरदार असल्याने या अवकाळीचा सौम्य फटका हापूसला बसणार असला तरी काही भागात झालेल्या पावसाने केसरसाठी अनुकूल वातावरणीय स्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज कोकण कृषी विद्यापिठाने वर्तविला आहे. मात्र, पुढील वातावरण उबदार झाल्यास या बागाही दोन टप्प्यांत मोहोरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. मात्र, गारठा पडायला लागल्यानंतर झालेल्या या पावसाने आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. काही भगात थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने फळ काळवंडले. त्यामुळे नुकसान झाले होते. मात्र, अद्याप थंडीचा जोर वाढला नसल्याने यंदाची वातावरणीय स्थिती अनुकूल असल्याचे बागायतदारांचे मत आहे.