हंगामाच्या प्रारंभीच आंबा बागायतदारांना फटका; अवकाळीने पाच टक्के मोहोर वाया 

रत्नागिरी:- गेले आठवडाभर अधुनमधून हजेरी लावणार्‍या पावसामुळे हंगामाच्या सुरवातीलाच आंबा बागायतदारांना फटका बसला आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या पंधरा टक्केपैकी पाच टक्के मोहोर पावसामुळे गळून गेला आहे. उर्वरित मोहोर काळा पडू नये यासाठी फवारणीचा भुर्दंड बागायतदारांना बसणार आहे.

हापूस आंब्याला मोहोर येण्यासाठी १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्यक आहे. अपेक्षित थंडी पडली नाही तर आंब्याला मोहोर येत नाही किंवा उशिर होतो. त्याचा फळ उत्पादनावर परिणाम होतो. गेल्या काही वर्षांपासून कोकणातील हापूस आंब्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. हापूसच्या कलमाच्या जून झालेल्या काडीमधून मोहोर फुटतो. गतवर्षी अनेक बागायतदारांच्या पदरी यामुळे निराशा आली होती. वातावरणात होणार्‍या सततच्या बदलामुळे हापूसमधून मिळणार्‍या उत्पन्नावर परिणाम होत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झाडाला मोहोर येऊ लागतो. सध्या तीच परिस्थिती होती. मोसमी पाऊस लांबला आणि परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत होता. त्यानंतर उन्हाचा ताप वाढला. त्यामुळे समुद्रकिनारी भागात मोहोर दिसू लागला. जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर आंबा लागवड आहे. त्यातील पंधरा टक्के झाडांना पहिल्या टप्प्यातील मोहोर येऊ लागला होता. दिवाळीत थंडीला सुरवात होईल अशी शक्यता होती पण तसे न होता अचानक अवकाळी धक्का बसला. त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर होऊ शकतो.

सध्या आंबा कलमांवर आलेला मोहोर सुरक्षित ठेवण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारणीला सुरवात झाली होती परंतु त्यावर पाऊस झाल्यामुळे बुरशी पडू नये यासाठी पुन्हा फवारणी करावी लागणार आहे. पंधराशे झाडांसाठी एका फवारणीसाठी सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च होतो. काही ठिकाणी मोहोर काळा पडून गळून गेला आहे तसेच कणीही गळून गेली आहे. भविष्यात बुरशी लागू नये यासाठी फवारणी करावी लागणार आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सायंकाळच्या सुमारास पाऊस पडतो. त्यामुळे काही बागायतदार सकाळच्या सत्रात फवारण्या आटपून घेत आहेत. दुपारी ऊन पडल्यावर ते नीट झाले की बुरशीपासून मोहोर वाचू शकतो.