महिला पतंजली योग समितीतर्फे आयोजन;
ना. सामंत यांचे बहुमोल सहकार्य
रत्नागिरी:- कोरोनापश्चात मानसिक व शारीरिक बळ देण्याकरिता योग सर्वात महत्त्वाचा आहे. त्याकरिता योगाचा प्रसार होण्याकरिता क्रांतीकारकांची भूमी रत्नागिरीतून राष्ट्रीय पातळीवरील योग विज्ञान शिबिरांचा प्रारंभ स्वामी रामदेव महाराजांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ८ मार्चला रामदेव महाराज रत्नागिरीत दाखल होणार असून ९ मार्चला पहाटे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महिला, पुरुष, विद्यार्थ्यांसाठी शिबिर होणार असल्याची माहिती भारत स्वाभीमान ट्रस्टचे राज्य प्रभारी बापूसाहेब पाडाळकर आणि पतंजलि योगपीठ (हरिद्वार) महिला केंद्रीय प्रभारी
सुधाताई अळ्ळीमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेला महिला पतंजली योग समिती राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी ॲड. विद्यानंद जोग यांच्यासह नगरसेविका शिल्पा सुर्वे व पतंजली समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेली सुमारे २० वर्षे हरिद्वार येथील पतंजली योगपिठाद्वारे स्वामी रामदेव महाराजांनी योगाचा देश-विदेशात योग शिबिरांद्वारे प्रसार केला. सध्या कोरोना काळ, सलग दोन वर्षे चक्रीवादळे, नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांच्या जीवनमान, व्याधीमुक्त करण्याकरिता योग विज्ञान शिबिर मोठ्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत. रामदेव महाराज ८ मार्चला सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीत येणार असून लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि पतितपावन मंदिर, स्वा. वीर सावरकर स्मारकाला ते भेट देणार आहेत. ९ तारखेला पहाटे ५ वाजता योग शिबिराला सुरवात होईल. त्यांच्यासोबत स्वामी परमार्थ देव, स्वामी आनंददेव आहेत.
याच दिवशी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य विषयक टिप्स, मुलांवर चांगले संस्कार व आनंदी निरोगी परिवार या त्रिसूत्रीय विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी ९ ते १२ या वेळेमध्ये स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला स्वामी रामदेवजी महाराज, पतंजली विश्वविद्यालयाच्या डीन, महिला मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. देवप्रिया यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी यांची पत्नी सौ. पाटील यांच्यासह निमंत्रित महिलांना व्यासपीठ दिले जाणार आहे. योग शिबिर व महिला मेळाव्याच्या नियोजनाकरिता रत्नागिरीतील पतंजली योग समितीसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी रत्नागिरीत मेहत घेत आहेत.
मंत्री उदय सामंत यांचे योगदान
स्वामी रामदेव महाराज १० वर्षांनंतर प्रथमच रत्नागिरीत येत आहे. याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योजक रवींद्र सामंत, किरण सामंत यांचे बहुमोल सहकार्य लाभत असल्याचे सुधाताईंनी सांगितले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन महिला पतंजली समितीने केले आहे.
सहभागींसाठी मोफत एसटी सुविधा
रत्नागिरी एसटी विभागाशी झालेल्या चर्चेनुसार ९ मार्चला पहाटे ३ वाजल्यापासून योग शिबिराला येणाऱ्यांकरिता मोफत एसटी सुविधा जाण्या-येण्याकरिता ठेवली आहे. तालुक्यातील सर्व मार्गांवरून एसटीच्या बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. एसटीकरिता नोंदणी करण्यासाठी ७ मार्चला सायंकाळपर्यंत ९७३००६९७११ आणि ९५७९७७७६०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
सहभागींसाठी सूचना
योगाला येण्याऱ्या महिला, पुरुषांची बैठक व्यवस्था केली आहे. मात्र आसन, पाणी बाटली, चप्पल ठेवण्याकरिता कापडी पिशवी सोबत आणावी. गाड्या पार्किंगसाठी क्रीडांगणाच्या मागील बाजूला व्यवस्था केली आहे.