घटनास्थळी मिळाला दात; डीएनए चाचणी अहवाल महत्वाचा
रत्नागिरी:- पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणी पोलिसांना पुरवाव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. खुनानंतरच्या तपासादरम्यान पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये घटनास्थळावर दात मिळाला आहे. सापडलेली मानवी हाडं आणि हा दात डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. या अहवालावरच या खून प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.
स्वप्नाली सुकांत सावंत या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती सुकांत गजानन सावंत यांनी २ सप्टेंबरला दिली होती. सावंत पती-पत्नीमध्ये खूप वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. याबाबत पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रारीदेखील दाखल आहेत. पती-पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला, असावा अशी तक्रार स्वप्नाली सावंत हिची आई संगीता कृष्णा शिर्के यांनी ११ सप्टेंबरला दिली. त्यामध्ये स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत, रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या उर्फ प्रमोद गावणंग या तिघांनी मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांत सांवत याने स्वतः आपल्याला सांगितल्याची लेखी तक्रार त्यांनी दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला दिशा दिली. गेले तीन दिवस पोलिसांनी अहोरात्र या प्रकरणाचा तपास सुरू केला. संशयित आरोपी सुकांत सावंत वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत होता. वर्षभर खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे सर्व घडत गेले; मात्र एक चूक त्यांना महागात पडली आणि त्यांचा कट उघड झाला.
पोलिसांना मृतदेह जाळलेल्या ठिकाणी ६ ते ८ मानवी हाडे सापडली आहेत तर बाजूलाच कुजलेल्या अवस्थेत मांस मिळाले आहे. यावरून तिथे खून झाल्याचे निष्पन्न झाले. संशयितांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर खुनाची कबुली दिली. या दरम्यान पोलिसांनी बारकाईने त्या भागाची तपासणी केली तेव्हा घटनास्थळावर एक दात सापडला आहे. मृताची ओळख पटवण्यासाठी हा पुरावा भक्कम आहे; मात्र त्यासाठी हाडे आणि दात डीएनए चाचणीसाठी पोलिसांनी पाठवला आहे. त्याचा अहवाल यायला अजून महिनाभर लागण्याची शक्यता आहे; मात्र या अहवालावर या खून प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे. डीएनए जुळला तर तिन्ही संशयितांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.