स्वप्नाली सावंत खून प्रकरणाचा पूर्ण उलगडा; मृतदेहाची हाडे पोलिसांकडून ताब्यात

रत्नागिरी:- शहरानजिकच्या मिर्‍या परिसरात ‘तो’ खून झाला काय? अस्थी गायब केल्या काय? पोलिसांत तक्रार केली काय? अन्‌ बघताबघता कबुली दिली काय? यावर सर्वत्र नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. यातच राजकारणातल्या मातब्बर व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते तर जिल्ह्यातील स्त्रिया किती सुरक्षित असू शकतात यावर देखील प्रश्नचिन्ह उमटवणार्‍या या घटनेचा छडा अखेर डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी लावलाच. त्यातच समुद्रकिनारी आढळून आलेल्या अस्थींनी तर तपासचक्राला आणखीनच गती मिळाली आहे. स्वप्नाली सावंतांच्या आढळल्या अस्थी, खून प्रकरणाला मिळाली गती असे म्हणत पोलिसांचे कौतुक होत आहे.
 

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून पती सुकांत सावंतसह अन्य दोघांनी भाताच्या पेंढ्यात त्यांचा मृतदेह जाळून सुमारे 18 ते 20 पोती राख व हाडे समुद्रात फेकली होती. त्यातील काही पूर्ण जळालेली तर काही अर्धवट जळालेली हाडे पोलिसांना सापडली आहेत. त्यामुळे स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात महत्वाचे तांत्रिक पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. सापडलेली हाडे डिएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेशोत्सवासाठी मिर्‍या येथील आपल्या घरी आलेल्या स्वप्नाली सावंत यांची हत्या करण्याचा कट पती सुकांत सावंत याने त्या तेथे येण्यापुर्वीच रचला होता. त्या येण्यापुर्वी त्याने मृतदेह जाळण्यासाठी आवश्यक पेंढा, पेट्रोल घरी आणूण ठेवले होते. दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता स्वप्नाली सावंत घरात एकट्याच होत्या. त्यावेळी त्याने रुपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग यांच्या मदतीने स्वप्नाली यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह घराच्या मागील बाजूला लपवून ठेवून सुकांत सावंत स्वप्नालीच्या मोबाईलमधील सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये घालून त्यांचे लोकेशन लांजा परिसरात दिसावे यासाठी लांजा येथे गेला होता.

तेथून परत आल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याने भाताच्या पेंढ्यावर मृतदेह ठेवून त्यावर पेट्रोल ओतून मृतदेह पुर्णपणे जाळला. त्यानंतर राख, हाडे सुमारे 18 ते 20 पोत्यांमध्ये भरुन ती समुद्रात टाकली. हत्या केलेली जागाही पूर्णत: स्वच्छ केल्यानंतर त्याने दि. 2 सप्टेंबरला स्वप्नाली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती. त्यानंतर या तपासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर स्वप्नाली सावंत यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेल्या तिघांकडून विसंगत माहिती मिळाल्याने पोलीस खूनाचा उलगडा करु शकले असे डॉ.गर्ग यांनी सांगितले.

स्वप्नाली सावंत यांच्या हत्येचा कट काही महिन्यांपुर्वीच रचण्यात आला होता. गणेशोत्सवात स्वप्नाली सावंत घरी आल्यानंतर त्यांचा काटा काढण्याची पुर्वतयारी सुकांत सावंत याने केली होती. हत्या केल्यानंतर मुख्य मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुकांतने कोणाचे मार्गदर्शन घेतले होते का? त्याने हत्येनंतर स्वप्नाली यांचा मोबाईल कोठे टाकला? सुकांतने केलेल्या हत्येची माहिती अन्य कोणाला होती का? याची चौकशी सुरु असल्याचेही डॉ.गर्ग यांनी सांगितले.
गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, प्रविण स्वामी, अमोल गोरे, विजय जाधव, महिला परिविक्षाधीन पोउनि श्रीमती मीरा महामुने, सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे, प्रशांत बोरकर, शांताराम झोरे , पोलीस हवालदार संदिप नाईक, जयवंत बगड, दिपक चव्हाण, प्रविण बर्गे, सचिन कामेरकर, सागर साळवी, वैभव मोरे, उमेश गायकवाड, विजय आंबेकर, बाळू पालकर, प्रसाद जाधव, निलेश कांबळे , सुभाष भागणे, महिला पोलीस हवालदार वैष्णवी यादव, पोलीस नाईक गणेश सावंत, रमीज शेख, सत्यजीत दरेकर, योगेश नार्वेकर, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, वैभव शिवलकर, विलास जाधव, वैभव नार्वेकर, निलेश कांबळे, अविनाश नवले, दत्ता कांबळे, महिला पोलीस नाईक अर्चना कांबळ, पोलीस शिपाई श्रीकांत दाभाडे, अमित पालवे, शिवानंद चव्हाण, अक्षय कांबळे ( फॉरेन्सिक युनिट, रत्नागिरी) राम खेडकर आदी अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. गुन्ह्याच्यातपासात कारवांचीवाडी येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञाची विशेष मदत झाली. तर  गुन्ह्याचा तपास करुन तो उघडकीस आणल्याबाबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी विशेष अभिनंदन केले आहे. एकूणच प्रयोगशाळा सहाय्यक व पोलीस पथक यांनी खाजगी दूरदर्शन चॅनेलवरील दिवंगत अभिनेते शिवाजी साटम यांच्या ‘सीआयडी’ मालिकेप्रमाणे खुनाचा छडा लावल्याची चर्चा सर्वत्र नागरिकांमध्ये सुरू आहे.