हातभार फाऊंडेशन; पाचवी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परिक्षांचा सराव होण्यासाठी हातखंबा येथील हातभार फाऊंडेशनने पाचवीतील शिष्यवृतीला बसलेल्या विद्यार्थ्यांची दोनवेळा मोफत सराव परिक्षा घेतली. यासाठी लागणारे 3 हजार 172 प्रश्नसंच फाऊंडेशनतर्फे मोफत देण्यात आले.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्या हातखंबा येथील हातभार फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुलांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे 5 जानेवारी आणि 13 मार्च रोजी आयोजन केले होते. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या 793 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन्ही सराव परीक्षेसाठी एकूण 3 हजार 172 प्रश्नसंच हातभार फाऊंडेशनतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. दोन्ही सराव परीक्षेत 29 केंद्रातील आलेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या एकूण 138 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाण व शिष्यवृत्ती मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली.
मंत्री सामंत म्हणाले, स्पर्धा परीक्षेबरोबरच इंग्रजी विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक असून भविष्यात राज्यासमोर रत्नागिरी जिल्ह्याने आदर्श प्रस्तापित करावा. यासाठी इंग्रजी विषयाकडे विशेष लक्ष देण्यासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा प्रशिक्षण संस्था यांनी राबवावेत व त्यासाठी सर्व सहकार्य माझ्यामार्फत केले जाईल. हातभार फाऊंडेशनने इंग्रजी विषयाच्या बाबतीत काम करावे. राज्यातील तीस लाख ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी तयारीसाठी एक राज्यस्तरीय उपक्रम राबवण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. जाखड म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेला न घाबरता सामोरे जाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चौकस होऊन अचूक पर्यायाची निवडणे करणे आवश्यक असल्याचे व त्यासाठी विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होणे आवश्यक. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात परशुराम कदम म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खासकरून हातभार फाऊंडेशन काम करणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांना शिकू द्यावे आणि इतर अशैक्षणिक कामे कमी केली तर त्याचा फायदा गुणवत्तावाढीसाठी होईल.
या कार्यक्रमाला उप जिल्हाप्रमुख महेश म्हाप, डायटचे प्राचार्य गजानन पाटील, उपशिक्षणाधिकारी संदिप कडव, श्री. कांबळे, उपसरपंच सुनील डांगे, गट शिक्षणाधिकारी सुनील पाटील, उत्तम भोसले, सरोज आखाडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका संच कृष्णा मेस्त्री यांनी पुरवले होते.