चॅटिंग, फोन कॉलची मिळणार माहिती ; पुराव्यांची पडणार भर
रत्नागिरी:- स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील विहिरीत फेकलेला मोबाईल शोधण्यास स्कूबा डायव्हिंगच्या टिमला यश आले आहे. दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर मोबाईल सापडला आहे. त्यामुळे पोलिसांना या निर्घृण खून प्रकरणी आणखी काही ठोस पुरावे मिळण्याची शक्यता आहे. काही चॅटिंग झाले आहे का, कोणाचे फोन आले, कोणाला केले याची इत्यंभूत माहिती पोलिसांना मिळणार आहे.
पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केलेल्या या खून प्रकरणाचा पोलिसांनी मोठ्या चतुराईने तीन दिवसात उलगडा केला. कौटुंबिक वादातून माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांचा पतीसह अन्य दोघांनी गळा आवळून खून केला. त्यानंतर घराच्या मागे तिचा मृतदेह जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले. संशयित तिन्ही आरोपींनी तशी कबुली दिल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. यावेळी तिचा मोबाईल आरोपीने बाजूच्या विहिरीत टाकून दिला होता.
पोलिसांना तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर बंगल्याबाहेरील विहिरीतील मोबाईल काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. दोन दिवस डिझेल पंप लावून पाणी उपसण्यात येत होते. परंतु पाणी संपत नव्हते. अखेर पोलिसांनी विहिरीतील मोबाईल काढण्यासाठी स्कूबा डायव्हिंगच्या टिमचा आधार घेतला. दोन दिवस ही टीम विहिरीच्या पाण्यातील मोबाईल शोधत होती. शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी त्याला यश आले. मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मोबाईलमुळे पोलिसांना या खुनाशीसंबंधी काही ठोस पुरावे मिळण्याची शक्यता आहे. खुनापूर्वी स्वप्नाली सावंत यांना कोणाचे फोन आले, कोणाशी चॅटिंग झाले, कोणाला फोन केले हे उघड होणार आहे.