स्कायवॉकवर 26 लाख खर्चून बनविले जाणारे व्हर्टिकल गार्डन रद्द करा: सुदेश मयेकर

रत्नागिरी:- शहरामध्ये अजुनही अनेक नागरीकांच्या समस्यांचे निवारण रत्नागिरी नगर परिषदेकडून अदयापही झालेले नाही. शहरातील बहुतांशी गार्डन देखील देखभाल दुरूस्तीअभावी ओसाड पडलेली आहेत. अशावेळी माळनाका येथील स्कायवॉक 26 लाख रु.खर्चून बनविले जाणारे व्हर्टिकल गार्डन रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.

रत्नागिरी परिषद हद्दीत माळनाका येथील सुमारे 2 कोटी रुपये खर्च करुन स्कायवॉक बांधण्यात आला. परंतु त्याचा काहीच उपयोग अजूनही होत नाही. आणि आता सुमारे 26 लाख रुपये खर्च करून त्या स्कायवॉक वर व्हर्टिकल गार्डन बनवले जात आहे. त्यासाठी रत्नागिरी नियोजन खात्यातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.

माळनाका येथील स्कायवॉक येथे व्हर्टिकल गार्डन 31 माच रोजी रक्कम 26,41,737 व प्रशासकीय मान्यता रक्कम 26,41,767, वितरित निधी हा 15,00,000 इतका आहे. या कामासाठी अनाठायी खर्च करण्यापेक्षा आज रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीमधील बहुतांशी गार्डनची कामे खितपत पडलेली आहेत. त्या गार्डनची अजूनही पाहिजे तशी देखभाल देखील करण्यात येत नाहीत. बहुतांशी गार्डन ओसाड पडलेली आहेत. तरी त्या गार्डनची देखभाल दुरुस्ती साठी हा निधी वर्ग करावा अशी मागणी सुदेश मयेकर यांनी केली आहे.

अशावेळी लाखों रुपये मंजूरीतून स्कायवॉक वरील तयार केले जाणारे व्हर्टिकल गार्डन रद्द करण्यात यावे. नागरीकांना आत्यावाश्यक सेवा पुरविण्याआधी नगर परिषदेने लक्ष केंद्रीत करावे. लोकांच्या पैशाचे योग्य ते नियोजन करुन रत्नागिरीकरांना सुखसोई उपलब्ध करुन देण्यात याव्या व मुख्याधिकारी यांना सुचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.