सोशल मीडियावर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीची बदनामी

खेड:- सोशल मीडियावर आपल्याला ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीचे बनावट अकाउंट काढून तिची बदनामी केल्याचा प्रकार खेडमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीला अनोळखी व्यक्तीने इन्स्टाग्राम अकाउंट ‘प्रतीक डिग्री’ या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ही फ्रेंड रिक्वेस्ट तरुणीने कोणतीही खातरजमा न करता स्वीकारली. मात्र, त्यानंतर त्याने तरुणीशी ‘चॅटिंग’ सुरू केले होते. काही कालावधीनंतर हे इन्स्टाग्राम अकाउंट बनावट असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने त्याला ‘ब्लॉक’ केले. त्यामुळे चिडलेल्या त्या व्यक्तीने त्याचा राग मनात धरून तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामचे बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकले.

‘तू इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सॲपला ब्लॉक का केलेस, तू मला अनब्लॉक केले नाहीस तर मी तुझे वारंवार बनावट अकाउंट काढून तुझी बदनामी करीन’, अशी धमकीही त्याने दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तरुणीने ब्लॉक केले म्हणून त्याने तिच्या मित्रमैत्रिणींना शिवीगाळीचे मेसेज करून, वारंवार वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरुन तरुणीला कॉल तसेच मेसेजही केले.