रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे एका मुलाला मारहाण करत त्याच्या घरात घुसून 20 हजार लांबवल्याप्रकरणी दोन अज्ञात महिलांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार 15 मार्च रोजी दुपारी 1 वा.घडली आहे.
याबाबत नाजनीन मोहम्मद हनिफ सोलकर (35, रा.सोमेश्वर मुस्लिमवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी यातील दोन संशयित महिलांनी फिर्यादींचा मुलगा आम्मारच्या कानाखाली, पाठीमध्ये व पोटावरती मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आम्मारचा पाठलाग करत त्याच्या घरात जात त्याला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.
ही घटना घडत असताना अम्मारची आई पैसे मोजत होती. आम्मारचा आवाज ऐकून ती बाहेर आली असतान दोन्ही संशयित महिलांनी त्यांचे 20 हजार रुपये चोरुन तिथून पळ काढला. याप्रकरणी दोन्ही महिलांविरोधात भादंवि कायदा कलम 379, 452, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.