सोमवारपासून रत्नागिरी शहराला एक दिवसआड पाणी पुरवठा

रत्नागिरी:- वाढता उष्मा आणि त्यामुळे जलदगतीने घटत जाणारा पाणीसाठा यावर उपाय म्हणून रत्नागिरी शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा सोमवार पासून एक दिवस आड करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शीळ धरणात जूनच्या पंधरवड्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे रनप प्रशासनाने कळवले आहे.

रत्नागिरी शहरात सद्यस्थितीत शिळ या एकमेव धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा या वर्षीच्या मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम झाला आहे. याचेच परिणाम स्वरुप म्हणजे या वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने रत्नागिरी नगरपरिषदेस पाणीपुरवठा करणा-या शिळ धरणात कमी पाणीसाठा झाला आहे. तसेच, चालू उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे होणा-या बाष्पीभवनामुळे पाण्याचा -हास विचारात घेता शिळ धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे.

सद्यस्थितीत शिळ धरणात 0.814 द.ल.घ.मी. इतका उपयुक्त म्हणजेच 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यदा कदाचित मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्त्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भिषण पाणीटंचाई उद्भवू शकते. परिणामी, धरणातील पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अल-निनोच्या प्रवाहामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरीकांस पोहचू नये यासाठी रनपने आतापासून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे.

संभाव्य भिषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरविणे कामी नागरीकांस पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणीकपात अनिवार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यासाठी सोमवार दि. 13 मे 2024 पासून शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. तरी, नागरीकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.