रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथील नेपाळी महिलेने घरात असताना आंबा फवारणीचे औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागलेल्याने तिला खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. उर्मिला मायाराम लोनिया (वय ४०, रा. सैतवडे, बोरसई मोहल्ला, रत्नागिरी. मुळ ः तिथिंपुरचरा जि. कैलाली, नेपाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार यांची पत्नी उर्मिला यांनी दुपारी एकत्र जेवण केले. त्यानंतर खबर देणार हे दुपारी अडीच च्या सुमारास आंबा बागेत कामाला निघून गेले. घरात ती एकटीच होती. ते कामाला गेल्यानंतर सायंकाळी चार वाजता वासिम शेखासन यांनी फोन करुन सांगितले की, तुमच्या पत्नीने आंबा फवारणीचे औषध प्राशन केले असून ती बेशुद्ध अवस्थेत आहे. तिला उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. ही माहिती मिळताच खबर देणार तात्काळ तेथे दाखल झाले. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.