सेनेला स्वपक्षातूनच बंडखोरीचे ग्रहण लागण्याची चिन्हे

रत्नागिरी:- तालुक्यात एकहाती सत्ता मिळवण्याची घोषणा करणार्‍या शिवसेनेला आता स्वपक्षातीलच बंडखोरीचे ग्रहण लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ५४ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीत उमेदवारीवरून तू तू मै मै सुरू असून पंचायत समिती सदस्यदेखील ग्रामपंचायत निवडणूक लढवू लागल्याने कार्यकर्त्यांनी करायचे काय? असा सवाल करत शिवसेनेत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने आजवर एकहाती सत्ता मिळवली. त्यातच उदय सामंत यांच्या शिवसेना प्रवेशाने सेनेची ताकद अधिकच वाढली. पक्षाची ताकद वाढली तरी कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करायचे कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच जुने-नवे असा वाद काही ठिकाणी रंगू लागला आहे. शिवसेनेने तालुक्यात एकहाती सत्ता आणण्याची घोषणा केली आहे. मात्र अर्ज दाखल करायला सुरूवात झाली तरी काही ठिकाणी अद्याप उमेदवारीबाबत एकमत न झाल्याने तेथील वाद सोडवायचा कसा? असा प्रश्‍न शिवसेना नेत्यांसमोर पडला आहे.

एकीकडे शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपसह इतर राजकीय पक्षांनी शिवसेनेला नामोहरण करण्यासाठी व्युहरचना आखली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला आहे. ५४ पैकी ५१ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात येतील अशी घोषणा शिवसेनेने केली आहे. मात्र कोतवडे,राई आणि डोर्ले या ग्रामपंचायतीबाबत शिवसेना संभ्रमित आहे.

त्यातच नाचणे ग्रामपंचायतीत इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. नेमकं तिकीट द्यायचं तरी कोणाला? असा प्रश्‍न पक्षश्रेष्ठींना पडला आहे. त्यातच पंचायत समितीचे सदस्य देखील ग्रामपंचायत निवडणूक लढवत असल्याने कार्यकर्त्यांनी केवळ झेंडे बांधायचे का? असा सवालदेखील शिवसैनिकांनी पदाधिकार्‍यांना केला आहे. त्यातच काही ठिकाणी युवा सैनिक इच्छुक झाल्याने शिवसेनेत नवा वाद निर्माण झाला आहे. युवा सेनेच्या हट्टापायी काही ठिकाणी शिवसेनेच्या सीट धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच तालुक्याचे युवा अधिकारी युवा सैनिकांना तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याने शिवसेनेत अंतर्गत कलगीतुरा चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेत आऊटगोईंगला सुरूवात होण्याची शक्यता असून इतर पक्षांना मात्र आयते उमेदवार शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे मिळणार आहेत. त्यातच सडामिर्‍या ग्रामपंचायत शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी विरोधकांनी संपूर्ण ताकद पणाला लावली असून नाचणे, कोतवडे, काळबादेवी, सडामिर्‍या आदी ग्रामपंचायती शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.