रत्नागिरी:- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या विजयात जेएसडब्ल्यू ग्रुपचा मोठा हात आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपने त्याच्या दुखापतीपासून बरे होण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च उचलला होता. दीड महिन्यापूर्वी ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जेएसडब्ल्यू ग्रुपद्वारे युरोपमध्ये प्रशिक्षण घेण्यात आले. येथून घेतलेल्या प्रशिक्षणामुळे त्याला खूप मदत झाली. क्रीडा उत्कृष्टता कार्यक्रम ही जेएसडब्ल्यूची योजना आहे. नीरज चोप्रा 2016 पासून या योजनेशी संबंधित आहे.
2019 मध्ये नीरजला कोपर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याचे करिअर धोक्यात आले होते. या काळात जेएसडब्ल्यू ग्रुपने नीरजच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलला होता, ज्यामध्ये फिजिओथेरपिस्टच्या सुविधांचा ऑपरेशनचा खर्च समाविष्ट आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतरच नीरज पुन्हा आपल्या क्रीडा कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करू शकला. या दुखापतीमुळे तो दीड वर्षे मैदानापासून दूर होता.
ऑलिम्पिकच्या सुमारे दीड महिना अगोदर युरोपमध्ये प्रशिक्षण घेतले होते. ऑलिम्पिक सुरू होण्याच्या दीड महिन्यापूर्वी, नीरज चोप्रा युरोपला गेला आणि प्रशिक्षण घेतले. ज्यामध्ये जेएसडब्ल्यूने त्याला मदत केली. नीरजला पदक मिळवून देण्यासाठी हे प्रशिक्षण खूप उपयुक्त ठरले. नीरजच्या प्रशिक्षक यांनी त्या काळात या प्रशिक्षणाची मागणी केली होती.
नीरज हा जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे प्रॉडक्ट आहे. त्याला जेएसडब्ल्यूने विशेष सहाय्य केले आणि त्याचे व्यवस्थापन देखील केले. आज नीरज याने भारताला गौरवांकित केले आणि ट्रॅक आणि फिल्डमधील पाहिले पदक भारताला जिंकून देत इतिहास रचला अशी माहिती जेएसडब्ल्यू ग्रुप व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
जिंदल ग्रुपचे सज्जनजी आणि पार्थजी यांचे अभिनंदन – रमेश कीर
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा याने कमावलेल्या गोल्ड मेडलबद्दल जिंदल ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय सज्जनजी आणि त्यांचे पुत्र पार्थजी यांचे अभिनंदन आरजेपीटी युनियनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी केले आहे. राष्ट्र सन्मानातील आपले हे योगदान शब्दातीत आहे, अभिमानास्द आहे असेही रमेश कीर यांनी आवर्जून नमूद केले आहे. आरजेपीटी युनियनच्या सर्व सदस्यांच्यावतीने त्यांनी जिंदल ग्रुपचे अभिनंदन केले आहे.