सीआरझेडच्या नव्या नियमांमुळे धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला चालना

रत्नागिरी:-मागील काही वर्षांपासून  जिल्ह्यातील  किनारपट्टीच्या भागात तयार करण्यात येत असलेल्या धूपप्रतिबंधक बंधार्‍यांची कामे रखडली होती. मात्र आता सीआरझेड मधील नियमात बदल करण्याच्या अनुकुलतेने धूपप्रतिबंधक बंधार्‍यांची कामेही वेगाने सुरू करण्यात आली आहेत. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील धूपप्रतिबंधक बंधार्‍यांची 60 ते 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

किनार्‍यांची होणारी धूप व किनारपट्टीच्या भागांचे लाटांपासून संरक्षण व्हावे यासाठी किनारपट्टीच्या भागात धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याची कामे पतन विभागाने हाती घेतली आहेत. यात काळबादेवी, सोमेश्वर, दापोली प्रत्येकी 100 मीटर अशा पाच ठिकाणच्या किनारपट्टीच्या भागात ही कामे सुरू केली आहेत. यासाठी 11.50 कोटी रुपये इतक्या निधीची ही तरतूद केली आहे. ही कामे पाच वर्षांपूर्वी मंजूर झाली होती.

मात्र धूपप्रतिबंधक बंधारे तयार करताना सीआरझेड परवानगी, टीएस परवानगी मिळण्यात आलेले अडथळ्यामुळे ही कामे रखडली होती. मात्र आता सीआरझेडमधील नियमात बदल करण्यात अनुकुलता दशविल्याने हळूहळू धूपप्रतिबंधक बंधार्‍यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने या कामाला खीळ बसली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याची कामे सुरू केल्याची माहिती पतन विभागाकडून देण्यात आली.