सिंधुरत्न समृद्धी योजनेतून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, तरुणांसह बचतगटांना मिळणार प्रशिक्षण

रत्नागिरी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यमाने शास्त्रीय पद्धतीच्या माध्यमातून सिंधुरत्न समृद्धी योजना जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये गावातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, तरुण, बचतगट आदींना विविध पिकांमधील यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गावागावांमधून शहरांमध्ये मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे शेतीकामांसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, यांत्रिकीकरणाद्वारे या मजुरांच्या समस्येवर मात करता येणे शक्य आहे. कृषीमधील यांत्रिकीकरणासंबंधी तांत्रिक मनुष्यबळ विकसित करणे ही काळाची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी शास्त्रीय पद्धतीने तांत्रिक मनुष्यबळ विकसित करण्याबाबतचा प्रयत्न सिंधुरत्न समृद्धी योजना, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गावातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, तरुण, बचतगट आदींना विविध पिकांमधील यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यातून भाडे तत्त्वावर भात पिकाची लावणी, पीक संरक्षण फवारणी, आंतरमशागतीची कामे, कापणी, मळणी, वारवणी, आवेष्ठन, उस पिकासाठी जमिनीची मशागतीवर भर देणे, तण नियंत्रण तसेच आंबा बागेच्या पुनरुज्जीवनामध्ये चलित यंत्राच्या सहाय्याने छाटणी, फवारणी, काढणी, बांबू पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान, अगरबत्ती निर्मिती आदी कामे अधिक प्रभावीपणे करता येणार आहेत.