साहिल मोरे आत्महत्या प्रकरणी मिताली न्यायालयापुढे हजर

रत्नागिरी:- रत्नागिरीत 21 ऑक्टोबर 2022 रोजी शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर साहिल मोरे या तरुणाने आत्महत्या केली होती. हे प्रकरण रत्नागिरीत चांगलच गाजल होत. त्यानंतर आरोपी मिताली भाटकर हिच्याविरूद्ध साहिल मोरे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खटला चालविण्यात येत आहे. नुकतेच मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी मिताली हिला 5 फेबुवारी रोजी सत्र न्यायालयापुढे हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार मिताली ही न्यायालयापुढे हजर झाली होती. रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस एस गोसावी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालविण्यात येत आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता 26 फेबुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

खटल्यातील माहितीनुसार साहिल विनायक मोरे (22, रा अलावा रत्नागिरी) या तरूणाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅट वर आत्महत्या केली होती. घटनेच्या दिवशी सकाळी साहिल याच्यासोबत मिताली ही देखील फ्लॅटवर होती. साहिल याने मिताली हिला वारंवार लग्नाविषयी विचारले होते मात्र मिताली हिने लग्नास नकार दर्शविला होता. यातून दोघांमध्ये वाद देखील झाला झाला. मिताली ही लग्नाला नकार देत असल्याच्या कारणातून साहिल याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. मिताली हिने लग्नाला नकार दिल्याने बदनामीच्या भितीने साहिल याने आत्महत्या केली अशी तक्रार साहिल याच्या नातेवाईकांकडून पोलिसात देण्यात आली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मिताली हिच्याविरूद्ध भादंवि कलम 306 नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून मिताली हिच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. आता तिच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला चालू आहे. पुढील सुनावणी 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.