सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या अनुदानापासून विद्यार्थी वंचित 

पंचायत समितीच्या बैठकीत गजानन पाटील आक्रमक 

रत्नागिरी:- सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचे अनुदान विद्यार्थ्यांना देण्यात आले नाही. पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे ठेवलेल्या निधीच्या व्याजातून हे अनुदान द्यायचे आहे. तरीही पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे बोट दाखवले जाते. चार -चार वर्ष योजनेचे अनुदान विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर त्या योजनेचा उपयोग काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत रत्नागिरी पंचायत समितीचा शिक्षण विभाग नेमका काय काम करतोय असा प्रश्न ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील त्यांनी उपस्थित करत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले.   

शुक्रवारी सभापती सौ. संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्यासह खातेप्रमुख सदस्य उपस्थित होते.  पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांनी सभागृहात दिला. यावेळी ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले.  पंचायत समितीने जिल्हा परिषडेकडे  ठेवलेल्या निधीच्या व्याजातून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसह शाळांना अनुदान देण्यात येते. कोरोना  प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात अनुदान देण्यात आले नाही, तर त्यापूर्वीच्या तीन पैकी एका वर्षी अनुदान देण्यात आले. आत्तापर्यंत चार वर्षाचे अनुदान पंचायत समितीने विद्यार्थ्यांना दिले नाही. हे अनुदान उपलब्ध करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची आहे. तरीही दुर्देवाने त्याची अंमलबजावणी केली जात नाही.  शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना या विषययाचे गांभीर्य आहे कि नाही, यापुढे असे चालणार नाही. जानेवारी महिन्याच्या सभेपूर्वी लाभार्थी विद्यार्थ्यांना अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी श्री. पाटील यांनी केली.