रत्नागिरी:- तुझ्या सांगण्यावरून तुझ्या मित्राला मी व्याजाने १० लाख रूपये दिले. तुझ्या मित्राची नावावर केलेली जमीन मला नकोय. माझे व्याजाचे पैसे आणि व्याजाची रक्कम मला परत कर असा दम देत बळकावलेली २५ एकर जमीन मध्यस्थी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्याला विकत घेण्यास भाग पाडून जमिनीचे खरेदीखत न करता २२ लाखाची रक्कम स्वीकारत फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरीतील ख्यातनाम सावकारासह एका नामांकित वकिलाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल होताच सावकार आपल्या घरातून रातोरात पसार झाला आहे.
रत्नागिरीत सावकारीचे लोण आजही वाढलेले पहायला मिळत आहे. यापूर्वी रत्नागिरीत चुकीच्या पद्धतीने सावकारी करणार्या सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे बड्या सावकारांचे धाबे दणाणले होते. अनेकांचे धंदे बंद होण्याच्या मार्गावर होते. मात्र राजकीय वरदहस्त लाभलेल्या काही सावकारांमुळे या कारवाया थांबविण्याचे फर्मान पोलिसांना मिळाले होते.
जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे संदीप मधुकर वेलोंडे यांची आणि निलेश कीर या सावकाराची चांगली ओळख होती. वेलोंडे यांनी यापूर्वी निलेश याच्यासोबत व्याजी पैशाचे व्यवहार केले होते. १० टक्के व्याजाने त्यांनी २५ हजार रूपये घेतले होते. व्याजासह ४५ हजार वेलोंडे यांनी कीर यांना दिले होते.
वेलोंडे यांचा मित्र सुभाष गराटे यांना १० लाख रूपयांची तात्काळ आवश्यकता होती. त्यांनी वेलोंडे यांना याबाबत विचारणा केली. वेलोंडे यांनी निलेश कीर याच्याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांचे फोनवरून बोलणेदेखील झाले. कारागृहासमोरील महापुरूष मंदिराबाहेर त्या तिघांची भेटदेखील झाली होती.
व्यवहाराचे बोलणे सुरू झाले. गराटे यांनी १० लाख रूपयांची व्याजी रक्कमेची मागणी केली. घेतलेली रक्कम व्याजासह सहा महिन्यात परत न केल्यास गराटे यांची ओरी येथे असलेली २५ एकर जमीन निलेश कीर यांच्या नावावर करून देण्याबाबत बोलणी झाली. त्यानंतर निलेश कीर याने जिल्हा परिषदेतील कर्मचारी वेलोंडे यांना मध्यस्थी ठेवून निलेश कीर याने १० लाख रूपयांची रक्कम वेलोंडे यांना व्याजी दिली.
पैशाचा जो व्यवहार ठरला होता त्यामध्ये सहा महिन्यात रक्कम व्याजासह परत न केल्यास २५ एकर जमीन निलेश कीर याच्या नावावर करून देण्याची बोली ठरली होती. सहा महिन्यात गराटे यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे निलेश कीर याने गारो यांच्या नावावर असलेली २५ एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली होती.
जमीन नावावर करून दिल्यानंतर गराटे मुंबई येथे निघून गेले होते व काही दिवसांनी ते पुन्हा रत्नागिरीत आले. यावेळी निलेश कीर आणि गराटे यांची भेट झाली. या भेटीत त्या दोघांमध्ये वादावादी झाली. ही वादावादी झाल्यानंतर मध्यस्थी वेलोंडे यांना बोलावून घेण्यात आले.
गराटे आणि कीर यांच्यात वाद सुरू असताना वेलोंडे त्या ठिकाणी आले व वाद करून पैसे मिळणार नाहीत. तुमच्या नावे आता जमीन झालेली आहे. त्यामुळे आता वाद करून उपयोग नाही. पैशाच्या बदल्यात २५ एकर जमीन तुम्हाला गराटे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय आता तुम्ही येथेच थांबवा असा सल्ला वेलोंडे यांनी दिला. यावेळी निलेश कीर याने तुझे कोरे चेक माझ्याकडे आहेत. तुझी वाटच लावून टाकतो अशी धमकी वेलोंडे यांना दिली.
या व्यवहारात मध्यस्थ म्हणून संदीप मधुकर वेलोंडे (रा. ओरी, मधलीवाडी) हे होते. निलेश कीर याने मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांची पाठ धरली. जिल्हा परिषदेतील त्यांच्या सरकारी कार्यालयात जावून कीर वेलोंडे यांना धमकावत होता.
१० लाखाच्या बदल्यात २५ एकर जमीन कीर याने आपल्या नावावर करून घेतली. मात्र ही जमीन कीर याला नको असल्याने मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांना आपल्याकडील जमीन विकत घेण्याचा तगादा लावला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ती २५ एकर जमीन मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
निलेश कीर याने आपल्या नावावर करून घेतलेल्या जमिनीचा दर २५ लाख रूपये सांगितला होता. वेलोंडे यांचे मित्र देवरूखकर आणि कीर याचे वकील ऍड. महेश नलावडे यांच्या माळनाका येथील कार्यालयात जमिनीच्या व्यवहाराची बोलणी झाली. या जमिनीचा दर २२ लाख ७२ हजार ठरला.
यातील वकील ऍड. महेश नलावडे यांच्या कार्यालयात त्यांनी आपले अशिल निलेश कीर यांच्या सांगण्यानुसार २५ एकर जागेचे खरेदीखत तयार केले होते. त्यामध्ये विकत घेणार म्हणून संदीप वेलोंडे तर विकत देणार म्हणून निलेश कीर याचे नाव होते. ठरल्याप्रमाणे २२ लाख ७२ हजार रोख रक्कम निलेश कीर याला देण्यात आली. त्यानंतर वकिलांच्या समोर या खरेदीखतावर सह्या करण्यात आल्या.
निलेश कीर याने हातात रक्कम स्वीकारल्यानंतर ही रक्कम मी घरी ठेवून येतो तुम्ही रजिस्टर ऑफिसला या असे सांगितले. त्यानुसार निलेश कीर रक्कम घेऊन घरी निघून गेला व वेलोंडे, देवरूखकर नामक व्यक्ती आणि कीर याचे वकील ऍड महेश नलावडे हे तिघे रजिस्टर कार्यालयात जावून पोहोचले. एक तास झाला तरी निलेश कीर त्या ठिकाणी आलाच नाही.
ज्या दिवशी हे खरेदीखत रजिस्टर होणार होते त्या दिवशी निलेश कीर आलाच नाही. वकील आणि कीर यांच्यात सर्व प्लॅन ठरला होता. वकिलांनी वेलोंडे आणि देवरूखकर यांना शब्द दिला. तुमचे खरेदीखत मी करून देतो, तुम्ही काळजी करू नका, असे सांगून त्या दोघांना घरी पाठवून दिले.
बॉण्ड पेपरवर हे खरेदीखत तयार करण्यात आले व त्यावर सह्यादेखील झाल्या होत्या. निलेश कीर याच्याशी वारंवार संपर्क वेलोंडे आणि देवरूखकर यंानी केला. मात्र कीर याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. वकिलानेदेखील उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच आपल्या ताब्यात असलेली खरेदीखताची सर्व कागदपत्रे कीर याच्याकडे देऊन टाकली.
१० लाखाच्या व्याजाच्या रक्कमेपोटी तिसर्याच व्यक्तीची जमीन नावावर करून घेऊन ती जमीन २२ लाख ७२ हजार रूपयाला व्याजाच्या व्यवहारात मध्यस्थी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्याला विकण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून २२ लाख ७२ हजार रूपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. पैसेही गेले, जमिनही गेली असे लक्षात आल्यानंतर वेलोंडे यांनी आता शहर पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी निलेश कीर (रा. मिर्या) व ऍड. महेश नलावडे यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३०८ (३), ३ (५), महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४४, ४५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.