रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात मागील दहा वर्षात परवानाधारक सावकारांची संख्या वाढली असली तरी 9 पैकी 5 तालुके हे सावकारी विरहित असल्याची माहिती समोर आली आहे. मंडणगड, दापोली, गुहागर, लांजा, राजापूर तालुक्यात अधिकृत परवानाधारक सावकारी व्यवसाय नसल्याची नोंद आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात 24 परवानाधारक सावकार होते ती संख्या आता 68 इतकी झाली आहे. सावकारी व्यवसायात रत्नागिरी तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे.
परवानाधारक सावकार व्यवसाय करणारे व्यापार्यांसह इतरांनाही कर्ज देतात. अशा सावकारांची संख्या रत्नागिरी तालुक्यात वेगाने वाढली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या नोंदीनुसार सन 2009-10 मध्ये रत्नागिरी तालुक्यात 16 परवानाधारक सावकार होते. ही सावकारांची संख्या सन 2019-20 नुसार 50 वर पोहचली आहे. पाठोपाठ चिपळूण तालुका असून दहा वर्षांपूर्वी या तालुक्यामध्ये 3 परवानाधारक सावकार होते ते आता 15 इतके झाले आहेत.
खेड तालुक्यात दोन आणि संगमेश्वर तालुक्यात एक परवानाधारक सावकारी सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी मंडणगड आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी एक सावकार होता. आता मात्र येथील सावकारी परवाने नूतनीकरण केले नसल्याने या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही परवानाधारक सावकार नाही. खेडमधील दोन सावकारांकडून कोणत्याही व्यापार्यांनी सन 2009 -10 मध्ये कर्ज घेतलेले नाही. पण इतर 160 जणांना कर्ज दिले होते. त्यानंतर 2019-20 मध्ये तब्बल 461 इतर व्यक्तींना कर्ज दिल्याची नोंद आहे. या काळातही व्यापार्यांनी खेडमधील सावकारांकडून कर्ज घेतलेले नाही.
चिपळूण तालुक्यातील 3 सावकारांनी 10 वर्षांपूर्वी 140 व्यापार्यांना कर्ज दिली होती. या व्यक्तीरिक्त इतर कोणालाही कर्ज दिली नव्हती. त्यानंतर सन 2019-20 मध्ये चिपळूणात 15 सावकार झाले असून त्यांच्याकडून 4 हजार 96 व्यक्तींनी कर्ज घेतली. व्यापार्यांनी मात्र चिपळूणातील सावकारांकडून कर्ज उचलेले नाही. सन 2009 -10 मध्ये रत्नागिरी तालुक्यात 16 परवानाधारक सावकार होते. त्यांच्याकडून 170 व्यापार्यांना आणि 1 हजार 476 इतरांना कर्ज मिळाली होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडील नोंदीनुसार दहा वर्षानंतर रत्नागिरी तालुक्यात 50 सावकार असून 40 हजार 309 इतर व्यक्तींना कर्ज पुरवठा केला आहे. या सावकारांकडून व्यापार्यांनी कर्ज घेतलेले नाही. दहा वर्षापूर्वी लांजातील एका सावकाराने 110 व्यापार्यांना कर्ज दिली होती. लांजा तालुक्यात आता एकही परवानाधारक सावकार कार्यरत नाही.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या नोंदीनुसार 4 तालुक्यातील 68 सावकारांकडून कोणत्याही व्यापार्याने कर्ज उचल केलेली नाही. मात्र तब्बल 45 हजार 863 इतर व्यक्तींनी कर्ज उचल केली. दरम्यान 10 वर्षापूर्वी मंडणगड तालुक्यात 1 परवानाधारक सावकार होते. मात्र त्यांच्याकडून एकाही व्यापार्याने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने कर्ज उचल केलेली नाही. आता या तालुक्यात परवानाधारक सावकार नाही.