साळवी स्टॉपला दररोज ६० हजार क्युबिक मीटर कचऱ्याचा धूर

रत्नागिरी:- शहरातील डंपिंग ग्राउंडवरील बेसुमार कचऱ्याचा प्रश्न गेली कित्येक वर्षे धुमसतो आहे. अनेक सत्ता आल्या आणि गेल्या; परंतु शक्य असतानाही घनकचरा प्रकल्प उभारण्याचे धाडस कोणत्याही सत्तेचे झालेले नाही. नुकत्याच्या पायउतार झालेल्या शिवसेनेच्या सत्तेमधील आरोग्य सभापती निमेश नायर यांनी या विषयाला हात घातला. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मीटर साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करून खत तयार करण्यात येत होते; परंतु पालिकेवर प्रशासक नियुक्ती झाली आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही प्रक्रिया ठप्प झाली.

रत्नागिरी पालिककेने स्वच्छ भारत अभियानात देशात नाव केले असले तरी स्वतःच्या घनकचरा प्रकल्पाबाबत पालिका अजून उदासीन आहे. जागेअभावी पालिकेचा घनचकरा प्रकल्प आधीच रखडला होता. त्यानंतर दांडेआडोम येथील हक्काच्या जागेसाठी स्थानिकांनी विरोध केल्याने पालिका न्यायालयात गेली. दांडेआडोम येथील सुमारे ७ एकर जागेचा विषय न्यायालयात पालिकेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर तरी पालिकेचा हक्काचा अत्याधुनिक कचरा प्रकल्प होणार हे निश्चित होते; मात्र काही राजकीय घडामोडी अशा घडल्या की, तेथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्या जागेतील प्रकल्प रद्द करण्यात आला. आता प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरूच आहे. एमआयडीसीत जागा मागण्यात आली; परंतु अजून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात २८ लाखाचा प्रस्ताव तयार करून घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. त्याचे खत तयार करण्यात आले. पहिल्या टप्यात ४ हजार क्युबिक मीटर जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. या खताची विक्री करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १ लाख ५६ हजार क्युबिक मिटर घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार होती. परंतु सत्ताधाऱ्यांची मुदत संपली आणि बायोमायनिंगद्वारे होणारी कचऱ्यावरील प्रक्रिया थांबली.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आज घातक आणि प्रदूषणकारी धुराचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे; मात्र आंदोलनाच्या इशाऱ्याने पालिका जागी झाली आहे.