सायबर गुन्ह्यातील पहिला आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश 

गुहागर:- क्रेडीट कार्डमधील लावण्यात येणारा जादा चार्ज रद्द करून देतो असे सांगत क्रेडीट कार्डची संपूर्ण माहिती घेत फिर्यादीच्या खात्यातील तब्बल ७९ हजार ९९९ रूपये लांबवणाऱ्या सायबर गुन्ह्यातील जिल्ह्यातील पहिला आरोपी गुहागर पोलिसांनी अटक केला आहे. गुहागरच्या तपासी पथकाने राजस्थानमधील जयपूर येथे जाऊन आरोपीला अटक करून यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

विशाल सिंग शेखावत उर्फ राजेंद्र सिंह शेखावत राहणार राजस्थानमधील जयपुर बेनार रोड गुळ गाव पटपटगज दिल्ली . असे आरोपीचे नाव आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी गुहागर पोलीस ठाण्यात याबाबतच गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी यांचे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड मधील लावण्यात येणारा जादा चार्जेस रद्द करून देतो असे आरोपीने फोनद्वारे संपर्क साधून फिर्यादी याना खोटे सांगितले. आरोपी याने फिर्यादी यांचे आयसीआयसी क्रेडिट कार्ड मधील १६ अंकी नंबर, सी व्ही व्ही क्रमांक व ओटीपी सांगण्यास सांगून त्यांचे क्रेडिट कार्ड मधील रु ७९ हजार ९९९ एवढी रक्कम लांबवली होती. याप्रकरणी आरोपीवर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये कलम ४२० , ४१९ भा द वि सह ६६ क, ६६ ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 

दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या देखरेखी खाली राहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, पोलीस हवालदार हनुमंत नलावडे, पोलीस नाईक राजेश धनावडे , पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ तसेच टॅब पथकाचे पोलीस हवालदार रमीझ शेख या पथकाने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा राजस्थानमध्ये जाऊन शोध घेऊन त्याला अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुहागर पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे सायबर गुन्ह्यातील आरोपींना चांगलीच धडकी बसली आहे.