राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे यांचा आरोप
रत्नागिरी:- गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. अगोदर नोटाबंदी नंतर जीएसटी यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीएसटी परताव्यापोटी ३० हजार कोटी रुपये केंद्राने अडवून ठेवल्याने राज्याच्या विकासाला खीळ बसला आहे. जनआशिर्वाद यात्रा काढण्यापेक्षा भाजपने माफीनामा यात्रा काढावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे यांनी केली. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारने नोटाबंदीच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम केले. पैसे असुनही अनेकांना आरोग्यासह धार्मिक कार्यही करता आले नाही. तर जीएसटीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. उद्योगपती धार्जिणे सरकार केवळ धनदांडग्या उद्योजकांना मदत करण्यात गुंतले आहेत. सत्तेवर आल्यानंतर रोजगार देण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. परंतु नवे रोजगार देण्याऐवजी त्याहीपेक्षा दुप्पट तरूणांना बेरोजगार करण्याचे काम सरकारने केले आहे. उद्योगपतींसाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशात हात घालून केंद्र सरकारने गरिबांची फसवणूक केल्याची तक्रार श्री.तटकरे यांनी केली.सत्तेसाठी राज्याच्या निवडणुका आणि आता जनआशिर्वाद यात्रा काढून भाजप कोरोनाच्या तिसर्या लाटेला केंद्र सरकार आमंत्रण देत आहे. देशात यापुढे तिसरी लाट आली तर त्याला भाजपच जबाबदार असेल असा आरोप श्री.तटकरे यांनी केला.
या पत्रकार परिषदेला प्रदेश चिटणीस बाप्पा सावंत, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहर अध्यक्ष निलेश भोसले, राष्ट्रवादी नगरसेवक सुदेश मयेकर, युवती जिल्हाध्यक्ष सौ.दिशा दाभोUकर, युवक तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.