साडेपाच हजार शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्याचे आदेश

रत्नागिरी:- आर्थिक अडचणीसह कर्जात अडकलेल्या शेतकर्‍यांसाठी राबविण्यात आलेल्या किसान सन्मान निधी योजनचा लाभ जिल्ह्यातील काही आयकर दाते तसेच शासकीय कर्मचारी घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 5 हजार 415 अशा सधन शेतकर्‍यांना पैसे परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 हजार 164 जणांनी 1 कोटी 46 लाख 60 हजार रुपये परत केले आहेत. उर्वरित शेतकर्‍यांकडील रकमेची अद्याप वसुली सुरू आहे.

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत चार महिन्यांनी दोन हजार रुपये म्हणजेच वर्षभरात शेतकर्‍यांना सहा हजार रुपये पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने 2019 साली सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे 2 लाख 69,083 लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ शेतकर्‍यांऐवजी आयकर दाते आणि शासकीय कर्मचारी घेत असल्याचे निदर्शनात आल्याने अशांकडून घेतलेल्या निधीची रक्कम भरून घेण्याची कारवाई सुरू आहे.

यापैकी आयकर दाते असलेल्या 4884 लाभार्थ्यांकडून आतापर्यंत 26,003 हप्ते भरण्यात आले आहेत. उर्वरित अपात्र शेतकर्‍यांकडील वसुलीबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, काही अपात्र ठरलेल्या शेतकर्‍यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्याकडील रक्कम कशी वसूल करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. वसुलीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत नियोजन सुरु आहे.