रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील सहा पुलांच्या कामांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या असुन त्यासाठी 3 हजार 105 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडी, बाणकोट खाडी, चिपळूण आणि वेलदूर यांना जोडणार्या दाभोळ खाडीवर दोनपदरी पुल यासह जयगड खाडीवर तवसाळ ते जयगड खाडी पुलाचे तट उभारण्यात येणार आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी ठेकेदाराला 36 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. काळबादेवी पुल उभारण्यासाठी माती परिक्षणाचे काम सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. त्यामुळे सागरी महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या कामांना गती मिळणार आहे. कोकणातील समुद्र किनार्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा महामार्ग, ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल या उद्देशाने सागरी महामार्ग उभारला जात आहे. मुंबईतून तळ कोकणात जाण्याचे अंतर कमी होणार आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग ठरणार आहे. बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांनी 1980 मध्ये रेवस-रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. या मार्गावरील मोठ्या पूलांची कामे रखडल्यामुळे सागरी महामार्गाचे काम रखडलेले होते. जानेवारी महिन्यात धरमतर आणि आगरदांडा खाड्यांवरील पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या होत्या. 14 मार्च 2024 ला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा पुलांच्या कामांच्या निविदा जाहीर केल्यामुळे सागरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. या मार्गावरील पुलांची कामे मार्गी लागली तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असून प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. निविदा काढण्यात आलेल्या कामांमध्ये रायगडमधील कुंडलिका खाडीवरील रेवदांडा ते साळव पुल, कोलमांडला ते बाणकोट खाडीवरील मोठा पुल, चिपळूण आणि वेलदूर यांना जोडणार्या दाभोळ खाडीवर दोनपदरी मोठ्या खाडी पुलाचे पोचमार्गासह बांधकाम, जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड या खाडी पुलाचे तट उभारणे, रत्नागिरीतील मिर्या-काळबादेवी खाडी पुल आणि कुणकेश्वर येथील पुलांचा समावेश आहे. काळबादेवी येथील पुलाचे पिलर उभे करण्यासाठी जागांचे माती परिक्षण करण्यात येत आहे. हे काम गेले महिनाभर सुरु होते. पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण झाले आहे. त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निविदा जाहीर करण्यात आल्यामुळे पुढील प्रक्रिया लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निविदांचा कालावधी, ठेकेदार निश्चिती आणि कामाला वर्कऑर्डर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आरंभ करण्यासाठी वेळ लागू शकतो.