आठ खाडीपुलांपैकी ६ खाडीपुलांची टेंडर प्रक्रिया पूर्ण
रत्नागिरी:- कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सागरी महामार्ग उभारणीसाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांतील ८ खाडीपुलांपैकी ६ खाडीपुलांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तर बाणकोट आणि दाभोळ खाडीपुलांचे टेंडर येत्या ७ जूनला उघडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळातर्फे सागरी महामार्गाचे काम केले जात आहे. या सागरी महामार्गावरील सर्वात लांब पूल धरमतर खाडीवर बांधण्यात येत आहे. या पुलाची लांबी १०.२ कि.मी. इतकी आहे. अगारदांडा खाडीपूल ४.३ कि.मी., कुंडलिका खाडीपूल ३.८ कि.मी., जयगड खाडीपूल ४.४, काळबादेवी खाडीपूल १.८ कि.मी. आणि कुणकेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावरून जाणारा पूल १.६ कि.मी. लांबीचा आहे. या सर्व पुलांच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, ठेकेदारांनी कामाला सुरवात केली आहे. यापैकी काही पूल हे केबलच्या आधाराने उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ ते जयगड जोडणाऱ्या खाडीपूलासाठी ७०० कोटींचा खर्च होणार आहे. रत्नागिरी आणि गुहागर या दोन तालुक्यांना जोडणारा तवसाळ ते जयगड या पुलाच्या बांधकामाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. जमिनीत तसेच खाडीच्या तळाशी असलेल्या भूभागाच्या परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरवात होईल. त्यासाठी ठेकेदाराने तवसाळमध्ये सुमारे २ एकर जागेत कामगारांसाठी वसाहत, काँक्रिट प्लांट, पुलाचे गर्डर तयार करण्यासाठी रॅम्प, लोखंडी सळ्यांच्या जोडणीसाठी स्वतंत्र शेड अशा उभारणीला सुरवात केली आहे.
भविष्यात कोकणात रिफायनरी, अणुवीज या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी प्रयत्न सुरू आहेत. ते प्रकल्प सागरी महामार्गालगत आहेत. गुहागरमधील कोकण एलएनजी आणि रत्नागिरी गॅस हे दोन्ही प्रकल्पही सागरी महामार्गालगत आहेत. त्यामुळे हा महामार्ग पर्यटनाबरोबरच आर्थिक विकासाला चालना देणारा ठरेल. पारंपरिक मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सागरी महामार्गाकडे वळेल. त्यामुळे सागरी महामार्गावर हॉटेल, लॉजसारखे नवे व्यवसायही उभे राहतील. त्यामुळे नवा मार्ग रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येणार असल्याचे बोलले जाते. सागरी महामार्गावर दाभोळ-धोपावे, तवसाळ-जयगड, वेस्वी-बागमांडला, दिघी-आगरदांडा असे खाड्यांच्या दोन्ही किनाऱ्यांवरील गावे फेरीबोटीने जोडलेली आहेत. या फेरीबोटीमधून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे पर्यटक, वाहतूकदारांची सोय होत आहे. अंतर कमी असल्यामुळे इंधन आणि वेळेचीही बचत होते. त्याचबरोबर फेरीबोटीमधून प्रवास करण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते. खाडीपूल झाल्यानंतर या वाहनचालकांना फेरीबोटीचा आधार घ्यावा लागणार नाही.