साखरपा येथे पादचारी महिलेला बसची धडक, महिला ठार

संगमेश्वर:- साखरपा बाजारपेठेमध्ये रस्त्याचे बाजूने जाणार्‍या वृद्धेला एसटी बस चालकाने धडक दिल्याने ती गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची घटना सोमवार 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. उर्मिला अनंत कबनूरकर (७५, साखरपा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपा बाजारपेठेत रस्त्याचे बाजूने चालत जात असलेल्या उर्मिला अनंत कबनूरकर याना एसटी बस चालकाने धडक दिली. त्यांच्या पायावरुन चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना साखरपा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे नेत असताना पालीनजीक रूग्णवाहिनी मध्ये त्यांची प्रकृती खालावली. पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले. या अपघाताची नोंद साखरपा पोलीस दूरक्षेत्रात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साखरपा येथील प्रसिद्ध व्यापारी व कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलचे श्रीधर कबनूरकर यांच्या त्या आई होत.