साखरपा पोलिसांनी पकडली जनावरांची अवैध वाहतूक करणारी गाडी


संगमेश्वर:- पुन्हा नव्याने सुरू झालेल्या साखरपा चेकपोस्ट येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी गाडी (क्रमांक एमएच डब्ल्यू 2527) ही टाटा झेनोन पीक अप गाडी पकडण्यात आली आहे. यामध्ये संशयित संजय राजू साळुंखे (२४) व आणखी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गाडी मध्ये असणारी जनावरे ताब्यात घेण्यात आली आहे. 

ही गाडी चिपळूण वरून कडेगाव सांगली या ठिकाणी नेण्यात येत होती. सदर आरोपींकडे कोणताही वाहतुकीचा परवाना नव्हता. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी सध्याच सुरू केलेल्या चेक पोस्टमुळे ही कारवाई पार पाडण्यात आली. 

पोलिस निरिक्षक निशा जाधव, एपीआय पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस फौजदार संजय उकार्डे, कॉन्स्टेबल रोहित यादव यांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई केली. प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत सदर आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील काही वर्ष हा चेकपोस्ट  बंद होता परंतु नूतन जिल्हा अधीक्षक मोहित कुमार गर्ग  यांनी तो पुन्हा सुरू केल्या मुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल. तसेच आंबा घाट या ठिकाणी अनेक गुन्हे घडतात त्यामुळे याला चाप लागू शकेल. तरी सदर घटनेचा तपास ए एस आय संजय उकार्डे, कॉन्स्टेबल रोहित यादव,किरण देसाई व अन्य कर्मचारी करत आहेत.