साखरतर मधील दाम्पत्याला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील साखरतर रेहमत मोहल्ला येथे किरकोळ कारणातून दाम्पत्याला मारहाण केली.याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवार 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वा.घडली.

असलम मोहंमद बारगीर आणि सुफियान असलम बारगीर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात महिलेेने दिलेल्या तक्रारीनुसार,सोमवारी सायंकाळी त्यांच्या घराच्यासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी आपली अ‍ॅक्सेस दुचाकी उभी करुन ठेवली होती. त्यावेळी असलम बारगीर याने त्यांची दुचाकी उचलून बाजुला केली. तेव्हा फिर्यादी महिलेच्या पतीने त्याला या आधी गाडी उचलून गार्ड मोडलास आता हॅन्डल पण तोडतो आहेस काय असे विचारले. या वादातून त्यांच्यात झटापट सुरु झाली.

ही झटापट सुरु असताना सुफियान बारगीर तेथे सळई घेउन आला आणि त्याने फिर्यादीच्या पतीच्या नाकावर, पाठीवर, हातांच्या कोपरांवर तसेच उजव्या पायाच्या अंगठ्यावर सळईने मारुन दुखापत केली. त्यावेळी फिर्यादी महिला पतीला सोडवण्यासाठी मधे पडली असता संशयितांनी तिच्याही तोंडावर हातांच्या ठोशांनी मारहाण केली.या प्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.