रत्नागिरी:- रत्नागिरीचे माजी पालकमंत्री शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत , अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे .
दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट व सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र शासनाच्या वन , पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच दिले आहेत . त्यानंतर राज्य शासनाकडूनही तत्काळ हालचाल सुरु झाली . रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनीही हे रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते . त्यानंतर रिसॉर्ट पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली . आता त्याचाच पुढचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत , अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे .